ज्या व्यक्तीचे मन बाहेरच्या दिशेने धावणारे असेल तर तो देवापर्यंत कधीच पोचू शकत नाही

रतलाम (मध्य प्रदेश) येथील आत्मोत्सव
८ मार्च २०१२
जेव्हा तुम्ही दुकानात काही घ्यायला जाता तेव्हा ती वस्तू तुम्हाला एका पुडक्यात मिळते. ते एक पुडके असते. ती वस्तू पुडक्यात बांधणे जरुरी असते परंतु ते पुडके ती वस्तू नसते. जे सत्व(द्रव्य) असते ते बांधलेले असते. त्याचप्रमाणे औपचारिकतादेखील पुडक्याची बाहेरील बाजू असते ...आवेष्टनाच्या कागदाप्रमाणे. तद्भाविता असणे हे महत्त्वाचे आहे. जर एकात्म भाव नसेल तर त्याला सत्संग किंवा उत्सव म्हणता येणार नाही.
मी पूर्ण जगभर प्रवास केला आणि माझ्या लक्षात आले की अध्यात्म आणि उत्सव ज्याप्रमाणे  भारतात खोलवर रुजलेले आहेत तसे दुसऱ्या कोणत्याही देशात नाही. एकीकडे ते अध्यात्मिक आहेत आणि दुसरीकडे ते मेजवान्यांना जातात आणि मौज मजा करतात. तथापि अध्यात्मिक संमेलनात कोणतीही मजा किंवा आनंद नसतो; ते फार गंभीर प्रकरण असते. हे असे गंभीर होणे आपण भारतातदेखील करतो, पण हे असे असता कामा नये! होळी सण हा मौज मजा करण्याचा, बागडण्याचा आणि आनंदित होण्याचा सण आहे.
तुम्ही सगळे होळी खेळलात का? कोणती होळी तुम्ही खेळलात? केवळ एकमेकांना रंग लावण्याच्या होळीबद्दल मी बोलत नाहीये. स्वतःच्या आत्म्याच्या रंगात रंगण्याचा सण आहे. आत्म्याचे सप्त रंग आहेत.
तुम्ही या समारंभाला फार छान नाव दिलात-आत्मोत्सव! आत्म्याचा उत्सव म्हणजेच आत्मोत्सव. जेव्हा जेव्हा बंगलोर, भोपाल किंवा इतरत्र मोठे समारंभ व्हायचे तेव्हा रतलामचे लोक मोठ्या प्रमाणावर उपस्थित असायचे आणि मला विचारायचे," तुम्ही रतलामला कधी येणार?"
पहा,मी आलो की नाही रतलामला?
तद्भाविता हे जीवनाचे सार आहे. तद्भाविता असली म्हणजे निरसता वाटत नाही. जिथे निरसता नाही तिथे लोभ उरत नाही. तुमच्या इच्छा तुम्हाला त्रास देणार नाहीत. सर्व विकृती नष्ट होतात. कोणत्याही विकृतीचे मूळ कारण असते जडता...म्हणजे जेव्हा तुम्हाला काहीही आवडत नाही. ही भावना निरसतेतून येते.
जिथे तद्भाविता असते तिथून निरसता पूर्णपणे नष्ट होते आणि तुम्ही आनंदी होता. आणि मग तुमचे दारूचे व्यसन अपोआपच सुटून जाते.
जगभरातील करोडो लोकांचा अनुभव आहे की जसे त्यांनी ध्यान आणि सुदर्शन क्रिया करणे सुरु केले तशी त्यांना त्यांच्या वाईट सवयीतून मुक्तता मिळाली.
मला माहिती आहे की प्रत्येक माणूस हा जन्मतः चांगलाच असतो आणि यात काहीही शंका नाही. प्रत्येकात चांगले गुण असतात. परंतु काळानुसार हे चांगले गुण झाकले जातात आणि विकृती डोक वर काढायला लागतात. अज्ञान आणि अध्यात्मिक ज्ञानाचा अभाव हे यामागचे कारण आहे.
जीवन कसे जगावे याबद्दल घरी आणि शाळेत शिकवण मिळत नाही. आपले मन कसे हाताळावे हे आपल्याला कळत नाही. स्वतःला कसे हाताळायचे हे सोडून आपण आयुष्यात बाकी सगळे शिकतो. हे शिकणे अतिशय महत्वाचे आहे.
(कोणीतरी श्री श्री यांना हार अर्पण करते आणि ते म्हणतात)या हारामागाच्या तुमच्या भावना मला समजतात. आपण आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही. ही फुले माध्यम बनतात. पण मी म्हणतो या सगळ्याची काहीच गरज नाहीये. तुमच्या चेहऱ्यावरील हास्य माझ्यासाठी पुरेसे आहे. तुम्ही फुललात की मग तुमच्या चेहेऱ्यावरील हास्य हे फुलापेक्षा सुंदर असेल. याने मला फार समाधान मिळते.
तर मग आपण काय बोलत होतो? तद्भाविता! तद्भाविता असायला पाहिजे. जिथे तद्भाविता संपते तिथे भ्रष्टाचार सुरु होतो. आपण आपल्या माणसानबरोबर कधीच भ्रष्ट आणि दुष्ट होऊ शकत नाही. आपण ज्यांना परके समजतो त्यांच्याशी असे वागतो. जर आज आपल्याला समाजात पुन्हा शांतता प्रस्थापित करायची असेल तर आपल्याला अध्यात्माची लाट निर्माण करणे जरुरी आहे. बरोबर? आपण सगळ्यांना याकरिता झटायला लागणार आहे.
आपल्याला हिंसा मुक्त समाज पाहिजे. असा समाज जिथे चोरी होणार नाही, एकमेकांबद्दल वैर भाव नसेल,आणि लोकांच्या परस्पर नात्याची वीण घट्ट असेल.
कोणे एके काळी आपला समाज असाच होता. भारतात जेव्हा अध्यात्म उच्च शिखरावर होते तेव्हा भारताची आर्थिक स्थिती फारच चांगली होती. परंतु अध्यात्माचा जेव्हा ऱ्हास झाला,  तेंव्हा आपण आर्थिकदृष्ट्या खालावलो. आपण दोन्ही प्रकारे पाहू शकतो: आपली आर्थिक स्थिती खालावली तेव्हा अध्यात्मातदेखील आपण खाली आलो. पण मी तर म्हणेन की आपण आपल्या समाजाला अध्यात्मातेच्या लाटेमध्ये बुडवून टाकू या, जर आपण योग, उद्योग आणि यज्ञ एकदम हाती घेतले तर महात्मा गांधीनी पाहिलेले "राम राज्य" भारतात नक्कीच अवतीर्ण होईल. तर मग आज आत्मोत्सवात आपण तीन गोष्टी करणार आहोत: गायन, ज्ञान आणि ध्यान.
जीवनात एका गोष्टीची नेहमी श्रद्धा ठेवा की तुम्ही एकटे नाही, तुमच्या सोबत कोणीतरी आहे. तुमचे सगळे त्रास,अडचणी आणि दुःखे तुम्ही मला देऊन टाका. केवळ म्हणा," गुरुजी, मला हे सहन होत नाही, कृपा करून हे घ्या". या प्रकारे विचार करा किंवा लिहून काढा, पाठवून द्या, तुम्हाला जसे करायचे ते करा पण निश्चिंत मनाने आयुष्यात पुढे जात राहा. मला एवढेच हवे आहे.
मौन नसलेला उत्सव काय कामाचा आणि ज्या मौनाचे रुपांतर उत्सवात होत नाही ते मौन काय कामाचे ? मौनामुळे उत्सवाला खोलपणा मिळतो तर उत्सवामुळे मौनाची आंतरिक शक्ती बाहेर येते. याकरिताच थोडा वेळ तरी ध्यानाचा सराव आपण केला पाहिजे. हे फार महत्वाचे आहे. यामुळे स्मरण शक्ती तल्लख होते आणि आपण निरोगी राहतो.
तुमच्यापैकी कितीजण अंग दुखीने बेजार आहात? तुम्हाला असे का होते ते माहिती आहे?
आपण आपल्या जमिनीमध्ये किटाणू नाशके आणि रसायने या सारखे विष पेरतो. त्यामुळे. आपण जमिनीमध्ये रासायनिक खाते घालतो आणि असे पीक आपण जेव्हा खातो,आपल्याला अंग दुखी होत.
माहिती आहे अगोदर आपण जेव्हा तांदूळ आणि गहू घरी साठवून ठेवायचो तेव्हा त्याला कीड लागायची, हो ना? परंतु आता तसे होत नाही.
याचा काय अर्थ आहे? आता तर किड्यांनासुद्धा आपण जे खातो ते आवडत नाही. कारण त्यांना माहिती आहे की यात विष आहे ते. आपण अस सगळ खातो आणि मग सगळे अंग दुखण्याने हैराण होतात. किती तरी लोकांना कर्क रोगाचा त्रास होतो आहे. म्हणूनच आपण रसायने मुक्त, जैविक शेती करायला पहिजे आणि असेच पदार्थ जेवले पाहिजे. जर काय खायचे हे जर समजले तर आपण आपल्याला दुखण्यांपासून दूर ठेवू शकतो. जर तुम्हाला स्वतःची देह शुद्धी करायची असेल तर आयुर्वेदाकडे या. आठवड्यातून एकदा तरी त्रिफळा चूर्ण घ्या. स्वतःचा कोठा साफ ठेवा.
देह शुद्धीकरीता तुम्हाला आयुर्वेदाचा वापर करावा लागेल. रोज थोडे प्राणायाम करा. याने तुमच्या शरीराला जोम मिळेल आणि मन ताजेतवाने राहील. आणि प्रत्येकाने संगीत हे ऐकलेच पाहिजे. लोक संगीत ऐकतात परंतु तेवढे लक्ष्य देऊन नाही. गाणे वाजत असते पण तुमचे मन मात्र इतरत्र भटकत तरी असते किंवा तुम्ही बोलत तरी असता. असे अजिबात असता कामा नये. काही काळ संगीत ऐका. संगीत तुमच्या भावना शुद्ध करते. ज्ञानामुळे मन शुद्ध होते. दानांमुळे संपत्ती शुद्ध होते. साजूक तुपामुळे अन्न शुद्धी होते.
भजन आणि भोजनात संकोच करू नये. नाहीतर मग तुम्ही शारीरिक दृष्ट्या आणि अध्यात्मिक दृष्ट्या उपाशी राहाल.
प्रश्न : गुरुजी,जीवनाचा उद्देश्य काय आहे?
श्री श्री रविशंकर : हा तुमच्या मनात फार चांगला प्रश्न उद्भवला आहे. स्वतःला भाग्यवान समजा. "जीवनाचा उद्देश्य काय आहे?" हा प्रश्न तुमच्या मनात उद्भवला हे तुमचे सुभाग्यच आहे.
आपण जीवन जगतच राहतो आणि जीवन खरोखर काय आहे याचा कधीच विचार करीत नाही. ज्याला याचे उत्तर माहिती आहे तो ते कधीच नाही सांगणार आणि जो याचे उत्तर देतो त्याला माहित नसते.
प्रश्न : गुरुजी, जर देव आपल्यामध्ये आहे तर आपण आयुष्यात दुःख का अनुभवतो?
श्री श्री रविशंकर : याचे कारण आहे की आपण देवाच्याप्रती अनुकूल नाही. सूर्य तर आहे पण जर तुम्ही त्याच्याकडे पाठ करून उभे राहिलात तर तुम्हाला केवळ स्वतःची सावली दिसेल. तुमचे दुःख ही ती सावली आहे. ते सत्य नाही तर केवळ सावली आहे, तुम्ही देवाप्रती अनुकूल नसल्याची ती सावली आहे. जेव्हा आपण देवापासून दूर जातो तेव्हा आपल्या वाट्याला दुःख येते.
प्रश्न : गुरुजी, भगवद्गीता आणि महाभारत यांच्यात काय फरक आहे?
श्री श्री रविशंकर : भगवद्गीता ही महाभारताचा भाग असून ते महाभारतातील एक प्रकरण आहे.
प्रश्न : गुरुजी, गुरु आणि सद्गुरु यांच्यातील फरक काय?
श्री श्री रविशंकर : काहीही फरक नाही, ते समानच आहेत. ज्याचे सत्य आचरण नाही त्याला गुरु म्हणता येत नाही. हे एक केवळ विशेषण आहे आणि काही नाही.
प्रश्न : गुरुजी, मनात फक्त एकाच उत्सुकता आहे की यश म्हणजे काय आणि आपण संपूर्ण यशस्वी कसे होऊ शकतो?
श्री श्री रविशंकर : तुमच्या चेहऱ्यावरील हास्य ही तुमच्या यशस्वी होण्याची खुणगाठ आहे. जर आयुष्यातील कोणत्याही प्रसंगाला तुम्ही हसत सामोरे जाऊ शकले म्हणजेच तुम्ही यशस्वी झालात.
प्रश्न : गुरुजी, तुम्ही नक्षलवादी आणि अतिरेकी यांना बदलू शकता का?
श्री श्री रविशंकर : नक्कीच, खूप जणांचा कायापालट झाला आहे! बऱ्याच नक्षलवाद्यनी मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे आणि आता ते चांगले मनुष्य झालेले आहेत. झारखंडात प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस काही तरी समस्या व्हायची. खूप जण आपले प्राण गमावून बसायचे. पण या वेळेस बघितले तर तुम्हाला दिसेल की हिंसाचाराची एक देखील घटना घडली नाही. बऱ्याच चांगल्या माणसांनी निवडणुकीत भाग घेतला. हजारोंच्या संख्येने नक्षलवादी आता समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत.
प्रश्न : कर्म, धर्म आणि अध्यात्म यापैकी कशाला आयुष्यात सर्वात जास्त महत्व दिले पाहिजे?
श्री श्री रविशंकर : तुम्ही टीवी आधी ऐकाल आणि नंतर मग बघाल? असे चालेल का? नाही, त्या दोन्ही क्रिया एकाच वेळेला व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे कर्म, धर्म आणि अध्यात्म हे एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत.
प्रश्न : गुरुजी, आपण दि आर्ट ऑफ लिविंगचे प्रतिनिधीत्व करतो. तर मग जगाला तोंड देताना आपली वागणूक काय असली पाहिजे?
श्री श्री रविशंकर : तुम्ही खरोखर चांगले मनुष्य असले पाहिजे. ढोंगी असता कामा नये. तुम्ही आतून आणि बाहेरून समानच असले पाहिजे. याचा अर्थ असा नाही की सत्य बोलण्यावर तुम्ही क्रुद्ध व्हावे. नेहमी जे परिपूर्णतावादी असतात किंवा ज्यांना प्रत्येक गोष्टीत बिनचूकपणा पाहिजे असतो, असे लोक नेहमी संतप्त होत असतात. अज्ञानाला कसे हाताळायचे हे आपल्याला माहित असले पाहिजे.                                                                                                               जर तुम्ही साधेपणाने प्रामाणिक आयुष्य जगू शकता तर मग तुम्ही जीवन जगण्याची कला(दि आर्ट ऑफ लिविंग) शिकलात.
प्रश्न : गुरुजी, आम्हाला कसे कळणार की आम्ही जे करतोय ते बरोबर आहे की नाही?
श्री श्री रविशंकर : स्वतःला विचारा. आपल्या अंतःकरणाला विचार. जर तुम्ही काही चूक केली असेल तर ते तुम्हाला टोचेल. पण जर तुम्ही काही योग्य केले असेल तर तुम्हाला निर्भय वाटेल. तुम्ही काही योग्य केले तर तुम्हाला कोणतीही भीती वाटत नाही. जर तुमच्या हातून काही प्रमाद घडला तर तुम्हाला त्याची टोचणी वाटेल,आतून चीड चीड होईल. तुमच्यासमोर अनेक समस्या उदभवायला लागतील.
प्रश्न : भ्रष्टाचार आणि आतंकवाद कधी संपणार? सनातन धर्म नष्ट होईल का?
श्री श्री रविशंकर : नाही, सनातन धर्म कधीच नष्ट पावणार नाही. अनादी काळापासून तो अस्तित्वात आहे आणि तो चालूच राहणार. दि आर्ट ऑफ लिविंगची स्थापना करून तीस वर्षे झाली आहेत. आज आपण असे म्हणू शकतो की जगभरातील सुमारे १५२ देशांमध्ये योग, प्राणायाम आणि सुदर्शन क्रियेचा सराव होतो.                                                                       जर तुम्ही दक्षिण धृवावरील सर्वात शेवटचे शहर तीएरा डेल फुएगो येथे गेलात तर तुम्हाला दिसेल की हजारो लोक प्राणायाम, ध्यान करत आहेत आणि ते शाकाहारी झालेले आहेत. जर तुम्ही उत्तर धृवावरील शेवटचे शहर ट्रोमसो इथे गेलात तर तिथे दोन महिने ना सूर्योदय होतो ना चंद्रोदय. तिथे विमानतळावर माझी वाट बघत उभ्या लोकांना बघून मी स्वतः आश्चर्यचकित झालो. ते म्हणाले," आम्ही येथील विश्वविद्यालयात साधना करतो". हे आता संपूर्ण जगभर आहे.                                         ११ मार्चला मी पाकिस्तानातसुद्धा जाणार आहे. मी साडेसात वर्षांपूर्वी पाकिस्तानला गेलो होतो. मी इंदोरला आलो आणि मग पाकिस्तानला गेलो.                                                                                                                                                             यावेळेस पुन्हा मी मध्य प्रदेशमधील इंदोर आणि रतलाम येथे आलो आणि येथून पाकिस्तानला जाणार. तिथेसुद्धा हजारो लोक साधना करीत आहेत. त्यांच्याकडे येण्याकरिता ते मला खुपच विनवण्या करीत होते. त्यांना मी खरोखरच पाकिस्तानला यायला हवे आहे आणि म्हणून मी येथून पाकिस्तानकरिता रवाना होईन.                                                        जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात आपले ज्ञान आणि ध्यान परंपरेची फार गरज आहे. आपणदेखील अर्थपूर्ण प्रस्तुती केली पाहिजे. मी जेव्हा पाकिस्तानला गेलो तेव्हा तिथल्या लोकांनी मला प्रश्न केला, "तुमच्या देशात इतक्या देवी-देवतांचे पूजन होते पण आमच्या देशात तर आम्ही एकाच देवाला पुजतो". मी म्हणालो, "नाही, आम्ही एकाच देवाची पूजा करतो, पण तुम्हाला माहिती आहे कशी? तुम्ही एकाच गव्हाच्या कणकेपासून समोसा, पराठा, शिरा आणि इतर पदार्थ बनवता. हे सर्व एकाच गव्हाच्या कणकेपासून बनवता. कराची हलवादेखील कणकेपासूनच बनवलेला असतो."                                      मी विचारले,"तुम्ही एका गव्हाच्या कणकेचे इतके पदार्थ का बनवता? त्याचप्रमाणे देव एकच आहे पण आम्ही त्याची वेगवेगळ्याप्रकारे पूजा करतो. एकाच देवाचे वेगळे गुण आहेत आणि प्रत्येक गुणासाठी आम्ही त्याला एक रूप दिले आहे. इस्लाम धर्मात अल्लाहची नव्याण्णव नावे आहेत."                                                                                                                        सनातन धर्मामध्ये एकशे आठ नावे आहेत आणि आम्ही तेवढी रूपे बनवली. फक्त एकशे आठ नाही तर मी म्हणेन की हजारो नावे "सहस्र नाम!" पण देव एकच आहे, "नूर" एक, "परमात्मा" एक आहे, आणि आम्ही केवळ "त्याचीच" आराधना वेगवेगळया नाव आणि रुपाने करतो. हे जेव्हा मी त्यांना सांगितले तेव्हा त्यांना एकदम बरे वाटले. ते म्हणाले,"आम्ही या पैलूने कधीच ऐकले नव्हते, आम्हाला असे ज्ञान कधीच मिळणे शक्य नव्हते. आम्ही नेहमीच असा विचार केला की तुम्ही लोक(इतर धर्माचे लोक) आमच्यापेक्षा भिन्न आहात."
सनातन धर्म म्हणजे काय? "वसुधैव कुटुंबकम", असे पुरातन काळापासून म्हटले आहे, याचा अर्थ, हे माझे स्वतःचे जग आहे, हे जग एकच कुटुंब आहे(विश्व कुटुंब). जर तुमचा येवढा उदार दृष्टीकोन असेल तरच तुम्ही स्वतःला धार्मिक म्हणू शकता.
प्रश्न : गुरुजी, या तंत्रज्ञानाच्या युगात, तरुण पिढीमधील अध्यात्म हरवत आहे.
श्री श्री रविशंकर : अजिबात नाही. इथे किती तरुण बसले आहेत ते पहा!
प्रश्न : लोक पैशाच्या मागे धावतात. अशा वेळेस आम्ही अध्यात्माबरोबर कसे काय जोडलेले राहू शकतो? मी कुठून सुरुवात करावी?
श्री श्री रविशंकर : अध्यात्म आणि आर्थिक व्यवस्था हे एकमेकांचे शत्रू नाहीयेत हे सर्व प्रथम लक्षात घ्या. हे सत्य स्वीकारा. अध्यात्म म्हणजे जीवनात भरभराट न करणे असे समजू नका. भरभराट करा, संपत्ती जमवा, त्यात काही चुकीचे नाही, पण हे धर्माने करा.
प्रश्न : गुरुजी, आज धार्मिक मेळावे सगळीकडे आयोजित होत आहेत परंतु धर्म हरवला आहे. याचे काय कारण असू शकते?
श्री श्री रविशंकर : मला असे नाही वाटत. जर तुम्हाला असे दिसत असेल तर जरा आपले डोळे थोडे चोळा. जगात चांगल्या लोकांची संख्या जास्त आहे. वाईट करणाऱ्यांची संख्या कमी आहे. परंतु चांगले लोक गप्प बसून राहतात, हे चुकीचे आहे. चांगले लोक गप्प राहिल्यामुळे, त्यांच्या निष्क्रियतेमुळे समाजाचा ऱ्हास होतो. आसुरी वृत्तीचे लोक थोडेसेच आहेत. ज्या दिवशी चांगले लोक सक्रीय होतील त्या दिवशी आसुरी लोकांचा बिमोड होईल.
प्रश्न : गुरुजी, २०१२ बद्दल खूप काही चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर भारताचे भवितव्य तुम्हाला कसे दिसते?
श्री श्री रविशंकर : भारताचे भवितव्य उज्वल आहे. या वर्षी लोक जागृत होतील. आणि मला खात्री आहे येथील तरुण पिढी जागी होते आहे. हे निवडणुकांमध्ये देखील दिसून येत आहे. लोक जागृत होत आहेत आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज चढवत आहे.
प्रश्न : गुरुजी, स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये इतका भेदभाव का आहे?
श्री श्री रविशंकर : भेदभाव करू नये. भारत असा देश आहे जिथे देवाला "अर्धनारीश्वर" अर्धी स्त्री आणि अर्धा पुरुष म्हणून बघतात. खरे तर भारतात स्त्रियांना पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढेच समजतात. जोडप्याचा उल्लेख करताना स्त्रीचे नाव प्रथम,श्रीमती व श्री, असे घेतात तर बाकीच्या ठिकाणी मिस्टर आणि मिसेस असे संबोधतात. इंग्रजीत कधीही मिसेस  आणि मिस्टर असे नाही म्हणत तर मिस्टर आणि मिसेस असेच म्हणतात. केवळ भारतात श्रीमती व श्री म्हटले जाते.
प्रश्न : गुरुजी, जीवनात कशाला जास्त महत्व दिले पाहिजे,प्रियजनांच्या आनंदाला की आपल्या स्वतःच्या?
श्री श्री रविशंकर : ते तुमचे दोन डोळे आहेत असे समजा. जर तुम्ही स्वतः आनंदी असाल तर तुम्ही दुसऱ्यांना आनंदी ठेऊ शकाल. आणि जर दुसऱ्यांना आनंदी करण्यात तुम्हाला आनंद मिळत असेल तर तुम्ही आयुष्यात खूप प्रगती कराल.
प्रश्न : गुरुजी, आयुष्यात संतुलन कसे ठेवायचे आणि जीवनाच्या उतार चढावात आनंदी कसे राहायचे?
श्री श्री रविशंकर : "गायन, ज्ञान आणि ध्यान"
प्रश्न : मुक्ती मिळवण्याचा मार्ग कोणता आहे?
श्री श्री रविशंकर : तुम्ही योग्य ठिकाणी पोहचला आहात आणि योग्य शब्द ऐकता आहात. ज्याला स्वतःला मुक्ती प्राप्त झाली आहे तोच केवळ तुम्हाला मुक्त करू शकतो. तुम्हाला समजत आहे का मी काय म्हणतो आहे ते?
प्रश्न : गुरुजी, वयाच्या कितव्या वर्षी तुम्हाला अध्यात्मामध्ये रुची निर्माण झाली?
श्री श्री रविशंकर : मी ती जन्मतः स्वतःबरोबर घेऊन आलो. मला वाटत हा माझा स्वभावच होता. मला माहित नाही पण जेव्हापासून मला कळायला लागले तेव्हापासून हे असेच आहे. हे जग मला नवीन आणि जुने असे दोन्ही दिसते. सगळे मला आपलेच वाटतात आणि मला अनोळखी कोणीच नाही.
प्रश्न : गुरुजी, खूप प्रयत्न करूनसुद्धा जर आम्ही चुकीच्या मार्गावरील माणसाला बरोबर मार्गावर आण्यात अयशस्वी झालो तर आम्ही काय करायचे?
श्री श्री रविशंकर : चुकीच्या मार्गावर गेलेल्याला सुधारण्याचे प्रयत्न करा. जर प्रयत्नांना फळ नाही आले तर त्याच्यासाठी प्रार्थना करा,तो नक्कीच चांगल्या मार्गाला लागेल.                                                                                                           प्रार्थना म्हणजे केवळ वरपांगीची नव्हे. त्याला चुकीच्या मार्गावरून चालताना होणाऱ्या वेदना तुम्हाला जाणवल्या पाहिजे. आणि त्या वेदना स्वतःजवळ ठेवू नका. त्या देवाला वाहून टाका.                                                                                       प्रार्थना हृदयाच्या खोलीतून उमटायला पाहिजे.,"हा माणूस लवकर बरा होऊ दे", आणि ही प्रार्थना नक्कीच देव ऐकेल. येवढे करून देखील काही उपयोग नाही झाला, तर ते त्याचे कर्म असे समजून विसरून जा.
प्रश्न : गुरुजी,  देव खरोखर अस्तित्वात आहे? जर आहे तर मग आम्हाला त्याची अनुभूती कशी होईल?
श्री श्री रविशंकर : देव अस्तित्वात आहे आणि तो तुमच्या आत आहे हेच तर सांगायला मी आलेलो आहे. त्याला पाहण्याचा प्रयत्न करू नका.                                                                                                                जर तुम्हाला कोणी सांगत असेल की तो देव बघण्यात तुमची मदत करेल तर समजून घ्या की तो मुर्ख आहे. देव काही भौतिक वस्तू किंवा  दृश्य नाही तर तो त्रिकालदर्शी आहे. म्हणूनच केवळ ध्यानामार्फत आपण देवापर्यंत पोहचू शकतो. ज्या व्यक्तीचे मन बाहेरच्या दिशेने धावणारे असेल तर तो देवापर्यंत कधीच पोचू शकत नाही. जर कोणाला वाटत असेल की तो भगवान हनुमंताला पाहू शकतो तर तो फक्त भास आहे. त्याच्या मेंदूमध्ये काही तरी गडबड असेल. का? कारण तुम्ही त्रिकालदर्शीला दृश्य म्हणून बघू शकत नाही. "तो" दृश्य नाही,भौतिक वस्तू नाही आणि आपल्यापेक्षा निराळासुद्धा नाही. परमात्मा हा आत्म्यामध्ये दडलेला आहे. जेव्हा तुम्ही ध्यान करता, तेव्हा तुम्हाला वाटत," अरे वा, ज्याला मी सगळीकडे शोधात होतो तो तर माझ्या आतच आहे." तुम्हाला असा अनुभव येईल. त्यानंतर तुम्हाला कोणीही हलवू शकणार नाही. तुमचे हास्य कोणीही पुसून टाकू शकणार नाही. तर देव इथे या क्षणी आपल्यामध्ये आहे, हे लक्षात घ्या आणि निश्चिंत व्हा. हे स्वीकारा आणि निर्धास्त व्हा. विश्रामामध्येच राम आहे.!
प्रश्न : गुरुजी, जीवनाचे सत्य काय आहे? कधी कधी मला वाटते की मी कल्पना विश्वामध्ये जगतो आहे!
श्री श्री रविशंकर : कल्पना विश्वातून बाहेर येणे हेच जीवनाचे सत्य आहे.
प्रश्न : गुरुजी, समाजासाठी काही करण्याकरिता मी काय करावे ?
श्री श्री रविशंकर : हा एक फार चांगला प्रश्न आहे. तुम्ही विचार करा तुम्ही काय करू शकता. मला सगळ्या तरुणांनी सहा महिन्यांकरिता आमची मदत करावी अशी माझी इच्छा आहे आणि मग आपण देशात सगळीकडे एक क्रांतिकारक लाट निर्माण करू. मग बघाच आपला देश कसा बदलेल. भारताला संपूर्ण जगात अग्रेसर पाहण्याचे माझे स्वप्न आहे. मला भारत बलवान बनलेला पाहिजे आणि आपल्याला आपली प्रतिष्ठा आणि मान पुनः मिळवायचा आहे....जी प्रतिष्ठा आणि मान प्राचीन काळात होता तो...तुमच्यापैकी कितीजण माझ्याबरोबर आहेत?                                                                              भारताला बलवान राष्ट्र म्हणून पुढे यायचे आहे आणि मला एकदेखील तरुण बेरोजगार नको. इथले किती तरुण बेरोजगार आहेत? मला तुम्ही इथल्या केंद्रात स्वतःचे नाव नोंदवा. या देशात करण्यासारखे खूप काही आहे. नळ दुरुस्ती करणारा, चालक, स्वयंपाकी आणि विजेची कामे करणारा हे आजकाल आपल्या देशात सापडणे कठीण होऊन बसले आहे. या लोकांसाठी प्रचंड पुरवठा आहे. आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देऊ.
आपली शिक्षण संस्था अतिशय जुनी आणि चुकीची आहे, त्यामुळे लोक शिक्षण संपवूनदेखील बेरोजगार राहतात. आपल्या देशात जे अशिक्षित आहेत त्यांना रोजगार मिळतो पण ५९% पद्व्योत्तरांना काम मिळत नाही. त्यांनी येवढे वर्ष शिक्षणावर इतकी मेहनत घेऊन पद्व्योत्तर अभ्यासक्रम संपवला तरीसुद्धा ते बेरोजगार आहेत. शिक्षण हे व्यवसायभिमुख असले पाहिजे. आपले शिक्षण असे असले पाहिजे ज्याद्वारे आपल्या रोजगार मिळवण्याच्या कसबेला धार मिळेल.  शिकवणे हे जर व्यवसायभिमुख असेल तर विद्यार्थ्यांचे शिक्षण संपल्या संपल्या त्यांना रोजगार उपलब्ध होईल. आपल्याला हा बदल घडवून आणणे गरजेचे आहे.
सगळ्या डॉक्टरांनी वर्षातून तीनदा मोफत वैद्यकीय शिबीर आयोजित करावे अशी मी त्यांना विनंती करतो. जर तुम्ही वकील असाल तर मला तुम्ही तीन खटले मोफत चालवून दिले पाहिजे. चार महिन्यातून एकदा हे त्या गरीब लोकांसाठी करा जे तुम्हाला तुमच्या फीचे पैसे देऊ शकत नाही.                                                                                                                                      तुम्ही हे करू शकाल?                                                                                                                                                         आणि जेवढे शिक्षक आहेत त्यांनी अभ्यासात कच्च्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी द्यावी. वर्षातून तीन विद्यार्थ्यांचा विचार करा. आणि जर तुम्ही विद्यार्थी असाल तर मतदान करण्याबाबत जन जागृती करा. सगळ्यांना मतदान करण्यास सांगा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध मत देण्यास सांगा.
प्रश्न : गुरुजी, तुम्हाला रामावतार, कृष्णावतार आणि तुमचा वर्तमान अवतार यात काय फरक वाटतो?
श्री श्री रविशंकर : यात फरक शोधणे मी तुमच्यावर सोपवले आहे. मी का सांगू? जो माझ्यात आहे, तुमच्यात आहे आणि सगळ्यांमध्ये आहे मी फक्त त्यालाच पाहतो.
प्रश्न : गुरुजी, आपल्याला जीवनात गुरुची खरोखर गरज आहे का?
श्री श्री रविशंकर : तुम्हाला याचे उत्तर पाहिजे का? जो प्रश्नाचे उत्तर देतो तो गुरु होतो आणि जो ऐकतो तो शिष्य होतो. तर असा प्रश्न विचारून तुम्ही तर कोंडीत सापडलात. आता तुम्ही हा प्रश्न विचारून म्हणता आहात, "मला गुरुची गरज आहे!" हे तर एखाद्या झोपलेल्या माणसाला "तू झोपला आहेस का?" असे विचारणे झाले. आता तो हो किंवा नाही म्हणाला तर त्याचा अर्थ एकच आहे आणि तो म्हणजे तो जागा आहे.                                                                                                                        त्याचप्रमाणे, तुमचे विचाराने, "आम्हाला गुरुची आवश्यकता आहे का?". कारण जर तुम्ही प्रश्न करता आहात म्हणजेच तुम्हाला गुरुची आवश्यकता आहे.
प्रश्न : गुरुजी,आम्ही सर्व प्रथम कोणाचे ऐकावे...मनाचे की हृदयचे?
श्री श्री रविशंकर : जेव्हा तुम्ही व्यवसाय करता आहात तेव्हा मनाचे ऐका. आणि जेव्हा तुम्ही आयुष्य जगता आहात किंवा काही समाज सेवा करता आहात तेव्हा आपल्या हृदयाचे ऐका. जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत असता तेव्हा आपल्या हृदयाचेच ऐका.

The Art of living
© The Art of Living Foundation