श्री श्री विश्व विद्यालयाचे दरवाजे उघडले

31
2012
Jul
बंगलोर
भुवनेश्वर,ओडिशा येथे आज आपण आपल्या विश्व विद्यालयाचे उद्घाटन केले.

या विश्व विद्यालयात विद्यार्थ्यांची पहिली तुकडी येऊन पोचली आहे, आणि हि विद्यार्थ्यांची पहिली तुकडी आपला अभिमान आहे, कारण ते अशा गोष्टीचा पाया आहेत जी खूप मोठी आणि भव्य होणार आहे.

ओडिशामधील श्री श्री विश्व विद्यालय हे मूल्ये आणि वैश्विक सहकार यावर आधारित आहे. पूर्वेकडील सर्वोत्तम आणि पश्चिमेकडील सर्वोत्तम गोष्टी विद्यार्थ्यांना विश्व विद्यालयात प्रदान केल्या जातील आणि ते मग वैश्विक नागरीक बनतील आणि त्यांचे कौशल्य आणि हुशारी ते संपूर्ण जगभर घेऊन जातील.

मी आपले कुलगुरू डॉ.मिश्रा आणि आपल्या विश्व विद्यालयाचे अध्यक्ष डॉ राव आणि इतर सर्व यांचे अभिनंदन करतो. त्यांनी थोड्या अवधीत अतिशय मेहनत केली आहे. त्यांना सगळे प्रमाणबद्ध करावे लागले. भुवनेश्वरमध्ये प्रचंड पाऊस असताना देखील. त्यांच्या समोर बरीच आव्हाने उभी ठाकली आणि ही आव्हाने पेलत त्यांनी ठरवलेल्या तारखेला विश्व विद्यालय सुरु केले. जस जसे आपण पुढे जात राहू, चांगल्या सुविधा या येत राहतील.

मी सगळ्या विद्यार्थ्यांचेदेखील अभिनंदन करतो; तुमचे भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे!

हे विश्व विद्यालय सुरु व्हायाच्यासुद्धा आधी,मला जगभरातून अनेक माणसांचे ते या विश्व विद्यालायाबरोबर कसे सलग्न होऊ शकतात असे फोन आले. आणि आज मला फार बरे वाटत आहे की आजच्या शुभ दिवशी आपण या विश्व विद्यालयाची सुरुवात केली. मला खात्री आहे की ही विद्यार्थ्यांची पहिली तुकडी ही आपल्या संघाचे नेतृत्व करेल.

ज्ञान, व्यक्तिमत्व, आर्थिक उन्नती, सामाजिक जबाबदारी आणि समाजाचे नेतृत्व हे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षित करतो. आणि मला खात्री आहे की ते एक नवीन आशा आणतील. आर्थिक ऱ्हास, नैतिक अधःपतन, सामाजिक अन्याय, गरीबी आणि इतर आव्हाने समोर ठाकली असता, ते एक नवीन आशा जागवातील.

आजच्या समाजासमोरील आव्हानांची मला गणती करायची नाही. पण मला खात्री आहे की हे तरुण करोडो लोकांचे अश्रू पुसतील आणि जगात आर्थिक उन्नती आणि भरभराट पुन्हा आणतील.

एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला दोन गोष्टींची आवश्यकता आहे :

१)    तुमचा दृष्टीकोन अधिक व्यापक पाहिजे,आणि

२) अधिकाधिक ज्ञानाने स्वतःला सुसज्ज करण्याची तयारी. स्वतःला केवळ अभ्यासक्रमात सीमित न ठेवता, अभ्यासक्रमाच्या पलीकडे पहावे.तुम्हाला जे शिकायचे आहे त्याची शिक्षकांकडे मागणी करा. माझ्या मते विद्यार्थ्यांनी उत्साही असणे गरजेचे आहे.

संस्कृतमध्ये एक जुनी म्हण आहे,'जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही आरामाची इच्छा ठेवू नये.आणि ज्यांना आरामाची सवय आहे त्यांना उच्च ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही.'

विद्यार्थिना कुटो सुखं;सुखार्थीनो कुटो विद्या.

याचा अर्थ असा नाही की तुम्ही असुखकारक राहावे. पण केवळ सुख आणि आनंद यावर लक्ष केंद्रित केले तर शिक्षणावर विपरीत परिणाम होईल. म्हणून जर तुम्ही ज्ञानाला लक्ष केले तर मग संपूर्ण आयुष्यभर सुखे आपणहून येताच राहतील.

ज्ञान हे आंतरिक आणि भौतिक सुखांना आकर्षित करते. म्हणून आपण ज्ञानावर लक्ष केंद्रित करावे आणि सुखे आपणहून आपल्या मागे येतील.

ही विद्यार्थ्यांची पहिली तुकडी आपल्या जगासाठीच्या मोठ्या आशेचे प्रकाशमान उदाहरण असतील या बद्दल मला समाधान आणि आत्मविश्वास आहे.

इथे जमलेल्या विभागांचे देखील मी अभिनंदन करतो. तुम्ही मानवतेचा नवीन पाया तयार करीत आहात.

या विश्व विद्यालयात भविष्यात अस्थिचिकित्सा शास्त्र, निसर्गोपचार, योग, आयुर्वेद आणि अनेक इतर शाखा असतील ; खास करून देशात दुर्मिळ असलेल्या.

भारतात पहिल्यांदा अस्थीचिकित्सा शास्त्राचा अभ्यासक्रम आम्ही सुरु करत आहोत. भारतात कोणालाही अस्थीचिकित्सेबाबत माहित नाही. जसे आपल्याकडे विषमचिकित्सा औषध आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे अस्थीचिकित्सा आहे जी स्नायूंच्या सांगाड्याची (सांधे,स्नायू आणि पाठीचा कणा यांची) रचना यांच्यात दुरुस्ती आणण्यावर लक्ष केंद्रित करते ज्यामुळे अनेक आजार बरे होतात. त्याने रोग प्रतिकार शक्ती देखील वाढते आणि मनुष्य संपूर्णपणे निरोगी आणि कुशल बनतो. म्हणून आम्ही असा अभ्यासक्रम आपल्या विश्व विद्यालयात सुरु करत आहोत.

आणि नंतर दी कॉलेज ऑफ गुड गव्हर्नन्ससुद्धा आपल्या विश्व विद्यालयात सुरु होणार आहे. आज प्रत्येक क्षेत्रातील लोकांना काही ना काही पात्रता असणे जरुरी आहे. परंतु राजकारणात हे अनुपस्थित आहे. म्हणूनच राजकारण्यांचा दर्जा हा कधी नव्हे इतका खालावला आहे. हीच कथा आहे प्रशासनाची-ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत,आपल्याला व्यवस्थित प्रशासन आणि सामाजिक नेतृत्व निर्माण करण्याची गरज आहे. दी कॉलेज ऑफ गुड गव्हर्नन्स हे येऊ घातले आहे. ते लवकरच येईल.

आता आज व्यवसाय व्यवस्थापन आणि व्यवसाय प्रशासन यांचे अभ्यासक्रम सुरु केलेले आहेत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये संपूर्ण जगभरातील ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाईल. याच हेतूने तर आम्ही हे विश्व विद्यालय सुरु केले आहे.

बघा ना, आपण आपल्या मुलांना लांबच्या देशांमध्ये पाठवतो. आपण त्यांना ऑस्ट्रेलिया, लंडन, अमेरिका इथे पाठवतो आणि त्यांच्या या विदेशी शिक्षणाकरिता आपण अमाप पैसा जमा करतो आणि खर्च करतो. येवढ करून आपल्या मुलांना तिथे नीट वागणूक मिळत नाही. त्यांना तिथे इतका हिंसाचार सहन करावा लागतो. आपल्या देशाने आपली बरीच मुले अशी गमावली आहेत. आपण आपली बुद्धिवान मुले अशा देशांना हरवून बसलो आहे.

म्हणून मी विचार केला की जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना भारतात बोलवावे, आणि मुलांना ज्याकरिता आपण त्यांना परदेशात पाठवतो त्या दर्जाचे शिक्षण इथे भारतात उपलब्ध करून द्यावे. जर इथे तसे विश्व विद्यालय असेल तर आपल्याला आपल्या मुलांना परदेशी पाठवण्याची गरज नाही. आपण आपला बराच खर्च वाचवू शकू आणि आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्याचे आपल्याला समाधान देखील वाटेल. हे डोळ्यासमोर ठेवून, आम्ही जागतिक दर्जाचे विश्व विद्यालय इथे ओडिशाला सुरु केले.

येत्या वर्षांमध्ये तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मुलांना या विश्व विद्यालयात पाठवावे असे मला सांगावेसे वाटते. तुमच्या मुलांना इथे जे शिक्षण मिळेल ते परदेशी शिक्षणाच्या तोलामोलाचे असेल. या विश्व विद्यालयात ते शैक्षणिक उत्कृष्टता गाठतील.

पुन्हा एकदा मी सर्व विद्यार्थ्यांना, विश्व विद्यालयात आलेल्या तरुण मनांना, आशीर्वाद देतो. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि मी लवकरच तुमच्या भेटीला येईन!

प्रश्न : प्रिय गुरुदेव, जेव्हा आपण या मार्गावर असतो तेव्हा इतर गुरुंचे ज्ञान आपण कोणत्या हद्दीपर्यंत ऐकू शकतो?

श्री श्री : सगळ्यांचा मान ठेवा हेच माझे म्हणणे असेल. केवळ एकच ज्ञान आहे आणि ते तुम्हाला उपलब्ध आहे. जर तुम्ही ते इथे तिथे खरेदी करत राहाल तर तुमच्यातील गोंधळ अधिक वाढेल. आम्ही म्हणतो,'सोहम करा.'

दुसरे कोणी म्हणेल,'नाही!सोहम बरोबर नाही,हमसा करा."

तिसरा म्हणेल,'हमसा बरोबर नाही,तुम्ही सदा सोहम करा.'आणि तुम्ही अधिक मोठ्या गोंधळात पडाल.

म्हणून, सगळ्यांचा आदर ठेवा आणि एका ज्ञानाला चिटकून राहा. जर त्या एका ज्ञानाने तुम्हाला समाधान दिले, तुमची जीवनात काही प्रगती झाली, तर तुम्ही त्यात खोलवर शिरा. ठिकठिकाणी खड्डे खोडून काही उपयोग नाही. एकच ठिकाणी खोलात जा.

प्रश्न : गुरुदेव, तुम्ही अहंच्या पलीकडे आहात आणि म्हणून तुम्हाला काही कर्म उरत नाही. परंतु तरीसुद्धा तुम्ही मानवतेच्या भल्याकरिता बरीच कर्मे करीत आहात.पण मग कर्माच्या नियमानुसार तुम्हाला फळे भोगावी लागणार. मग तुम्ही हे कसे करता?

श्री श्री : एकदम सोप्पे! हे मोरपिसाहून हलके आहे.

प्रश्न : गुरुदेव बऱ्याच वर्षांपासून माझ्या मनात एक इच्छा आहे. आतापर्यंत ती पूर्ण झालेली नाही. याचे काय कारण असेल?

श्री श्री : समय! त्याला त्याचा समय घेऊ द्या. तुम्ही सतत असे म्हणा, 'जर ही इच्छा माझ्यासाठी चांगली असेल तर ती पूर्ण होईल. नाहीतर मग नाही होणार.'

प्रश्न : सर्वात प्रिय गुरुदेव, अध्यात्म हे बंधनकारक आहे का? अध्यात्माचा मार्ग इतका निसरडा का आहे?

श्री श्री : हो का? तसा तो भासतो पण तो तसा नाही. अध्यात्माचा अर्थ आहे वातानुकूलित-पूर्णतः आराम

प्रश्न : प्रिय गुरुदेव, विश्वामध्ये घडणारी प्रत्येक घटनेची माहिती देवाला असते असे मी समजतो. तर मग देव गुन्हेगारी का वाढवतो आणि नंतर मग चांगल्या गुणांनी त्याला शह का देतो. कृपया समजवा.

श्री श्री : अशाप्रकाचे बरेच प्रश्न आहेत. देवाने दोन डोळे समोर का ठेवले? त्याने एक डोळा समोर आणि एक मागे ठेवायला पाहिजे होता. म्हणजे मग तुम्हाला मागे वळून पाहण्याची गरज नव्हती. तुम्ही बाजूने जाऊ शकता,नाही का?मला वाटते की देवाकडे कल्पनांची कमतरता आहे.

जर तुम्ही सिनेमाच्या दिग्दर्शकाला विचारले,'नायिका मिळवण्यासाठी नायकाला इतक्या अडचणींचा सामना का करावा लागला,आणि खलनायक का आहे? तुम्ही एवढे नाट्य कशाला निर्माण करता?सगळे काही सरळ सोपे असले पाहिजे.' तर तो काय म्हणेल? शोधून काढा! नंतर मी तुम्हाला सांगेन. कारण देवाचेदेखील हेच उत्तर असेल!

प्रश्न : सर्वात प्रिय गुरुदेव, गुरु मंडल म्हणजे काय ते कृपया समजवा!

श्री श्री : जेव्हा तुम्ही गुरूच्या निकट जाण्याचा प्रयत्न करता तेव्हा बऱ्याचशा गोष्टी मध्ये येतात.-यालाच गुरु मंडल म्हणतात.

सुरुवातीला तुम्हाला अनेक विकर्षण मिळतील. आणि जेव्हा तुम्ही ती पार कराल तेव्हा अनेक आकर्षक गोष्टी येतील. अनेक सिद्धी मिळतील. नवीन लालसा आणि घृणा निर्माण होतील. आणि तुम्ही हे सर्व पार कराल आणि मग मंडलाच्या मध्यभागी पोचाल.

मंडल म्हणजे वर्तुळ.

तर,तुम्ही गुरूला भेटण्यास आणि साधना करण्यास इथे आलेले आहात आणि अचानक तुम्हाला एक सुंदर मुलगी किंवा मुलगा भेटतो आणि मग तुम्ही त्यांच्या पाठी पळू लागता. किंवा तुम्ही ज्ञानाकरिता आला आहात आणि अचानक तुमचे मन म्हणते, 'अरे, मला तर पैसा कमवायचा आहे.मी हे कसे काय करू शकतो?' तर अशा प्रकारची विकर्षणे तुमची एकाग्रता दर्शवतात; तुमची केंद्रबिंदूकडे जाण्याची शक्ती प्रदर्शित करतात. हे नकारात्मकतेचे, शंकांचे, आकर्षणांचे, लालसेचे आणि या सर्व विकर्षणांचे वर्तुळ तुम्ही कसे काय पार करून केंद्राकडे जाऊ शकणार!

आणि 'मी तर गुरूपेक्षा चांगला आहे, अरे गुरुदेव हे काय बोलत आहेत, मलादेखील हे माहित आहे. मी यापेक्षा बरे करू शकतो.' असे म्हणणारा अहं हा आहेच.

या प्रकारची योग माया येते. हे सगळे आहे आणि या सगळ्याला गुरु मंडल म्हणतात.

प्रश्न : दी आर्ट ऑफ लिविंगचा अण्णांच्या चळवळीला पाठींबा आहे का?

श्री श्री : दी आर्ट ऑफ लिविंग ही IAC (India Against Corruption) चळवळीची संस्थापक आहे.सुरुवातीपासूनच आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध उभे ठाकले आहोत आणि आमचे प्रयत्न चालूच आहेत.

मी अण्णाजी आणि त्यांच्या संघाला उपोषण सोडण्याचे आव्हान करतो. तुमच्या प्रयत्नांची देशाला खूप जास्त गरज आहे. जवळ जवळ ३५० तरुण तिथे गेल्या सहा दिवसांपासून बसून आहेत आणि आता सातवा दिवस येणार आहे. कृपा करून अजून उपोषण करू नका आणि स्वतःच्या शरीराला इतक्या यातना देऊ नका. मी तुम्हाला आव्हान करतो की तुमचे उपोषण सोडा परंतु तुमचा लढा सुरूच ठेवा.

अजून बरेच काम करायचे आहे आणि या देशात आपल्याला अजून खूप बदल घडवून आणायचे आहेत. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करावायचे आहे आणि या प्रयत्नामध्ये आपण सगळे एकजूट आहोत.

या देशातील भ्रष्टाचार निर्मुलन करण्याचा आपला एकच उद्देश्य आहे, परंतु आपली साधने वेगळी आहेत. आपली कार्यपध्दती वेगळी आहे.

आमचा दृष्टीकोन हा कोणाचा अपमान करणे अगर कोणाला दुषणे देण्याचा नाही. आम्ही कोणाच्या घरी जाऊन हिंसा आचरत नाही. कोणत्याही प्रकारची हिंसा वा बळजबरीवर आमचा विश्वास नाही.

आमच्या सतसंगामध्ये एक प्रकारची उर्जा असते जी खूप उच्च आणि अतिशय सकारात्मक असते. ती मत्सर आणि क्रोधाची नसते तर ती असते उत्साह,उमेद आणि आशेची,काहीतरी करण्याची,बदल घडवून आणण्याची. आणि आम्ही आमच्या लक्ष्याकडे या तडफेने चालत जातो.

जागरुकतेने आणि उत्साहाने पुढे जाणे ही दी आर्ट ऑफ लिविंगची पद्धत आहे. या मार्गाला आम्ही आपलासा केला आहे. म्हणून आपण निषेध केला पाहिजे परंतु संपूर्ण जागरुकतेने,संपूर्ण ज्ञानाने आणि संगीता सहित.

अण्णाजी आता या क्षणी उपोषणाला बसले आहेत आणि त्या ठिकाणी आपले आर्ट ऑफ लिविंगचे गायक तिथे बसून गायन करून तिथल्या जनतेला प्रोत्साहन देत आहेत. परंतु दुर्दैवाने काल तिथे काही लोक दंगेखोर होते; जे आर्ट ऑफ लिविंगचे नव्हते. असे होता कामा नये आणि अशा दंगलखोरीला मी मान्यता देत नाही. आपल्याला क्रांती घडवून आणायची आहे पण संपूर्ण जागरुकतेने.म्हणून आपण सगळ्यांनी विचारपूर्वक कृती करायला पाहिजे.

प्रश्न : गुरुदेव, मी इतक्यातच TTC (शिक्षक प्रशिक्षण कोर्स) संपूर्ण केला आहे. मी पूर्णवेळ शिकवावे किंवा नाही याचा निर्णय घेण्याचा मापदंड काय आहे?

श्री श्री : तुमच्या पारिवारिक जबाबदारीकडे बघा. जर काहीच जबाबदारी नसेल तर तुम्ही पूर्णवेळ शिक्षक बनू शकता. जर घरची जबाबदारी जास्त असेल तर मला तुम्ही तुमची जबाबदारी पेलून कडेकडेने शिकवलेले आवडेल.