यशस्वी वैवाहिक जीवनाचे रहस्य

12
2012
Aug
बंगलोर
भावना,ध्वनी आणि राग (स्वर माला किंवा तराणा)

हे शेवटचे गायलेले भजन हे जोगिया रागात होते. तुम्ही हा राग राधे सोबत निगडीत धरू शकत नाही. जर तुम्ही, 'शिव, शिव', म्हणालात तर ते वैराग्याच्या रागासोबत निगडीत करू शकतो.

एकदा कोणाला विवाहाच्या स्वागत समारंभाचे आमंत्रण होते आणि त्याला गाणे म्हणण्याची विनंती केल्या गेली. तर त्याने (कन्नड भाषेत) गाणे म्हणणे सुरु केले, 'प्रिय आत्म्या,तू देहाला सोडून का निघून गेलास? हा मृत्यू समर्थन करण्या योग्य आहे का?'

त्या प्रसंगाला हे गाणे उचित होते का?

तुम्ही कोणतेही गाणे कुठेही म्हणू शकत नाही. भावना आणि राग हे एकमेकांना अनुरूप असले पाहिजे.

आपले आयुष्य हे या सारखेच आहे. आयुष्याचा प्रवाह हा अखंड वाहतच असतो परंतु पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजे मागेच जात राहतो. 

तुम्ही हे बघितले असेल की वाहत्या नदीमध्ये काही ठिकाणी जर अडथळा असेल तर पाणी उलटे वाहू लागते. आणि जिथे कुठे प्रवाह उलट्या दिशेने असेल तिथे घाण कचरा जमा होतो. पुढच्या दिशेने वाहणारा प्रवाह हा नेहमीच स्वच्छ असतो. तसेच आपणसुद्धा जर पुढे जात राहिलो तर मनामध्ये प्रसन्नता राहते. जर आपण भूतकाळाबद्दल सतत विचार करीत राहिलो तर मनामध्ये कोलाहल उठतो.

आज कोणीच काही प्रश्न विचारीत नाहीये ! याची केवळ दोन करणे असू शकतात. एक तर तुम्हाला सगळे माहित आहे. किंवा मग मी बोलत असलेला एकही शब्द तुम्हाला समजत नाहीये. (कारण गुरुदेव हे कन्नड भाषेमध्ये संवाद साधत होते). तुमची काय परिस्थिती आहे?

श्रोते: जेव्हा कधी आम्ही तुम्हाला बघतो, आम्ही सगळे प्रश्न विसरून जातो!

हे तर फारच छान आहे.

प्रश्न : यशस्वी वैवाहिक जीवनाचे रहस्य काय आहे?

श्री श्री : मला वाटते की तुम्ही चुकीच्या व्यक्तीला विचारीत आहात!

इथे जर्मनीचे सद्गृहस्थ आणि इटलीची महिला होती. दोघांनीही अनेक वेळा लग्न केले होते. ते इथे आले आणि म्हणाले,'गुरुजी,आम्हाला तुमचे आशीर्वाद पाहिजेत. निदान हे लग्न तरी टिकू दे.'

मी त्या सदगृहस्थाला विचारले की त्याला इटालियन भाषा येते का आणि तो नाही म्हणाला. मी त्या महिलेला विचारले की तिला जर्मन भाषा समजते का आणि ती नाही म्हणाली. दोघांनाही इंग्रजी येत नव्हते. मी म्हणालो,'एकमेकांची भाषा शिकू नका आणि तुमचे लग्न यशस्वी होईल.'

कन्नड भाषेमध्ये एक म्हण आहे, 'केवळ शब्दांमुळे वितुष्टाची सुरुवात होते. केवळ शब्दांद्वारा लोकांना आनंद मिळतो. केवळ शब्दांद्वारा लोक संपत्ती कमावतात. म्हणून शब्द जपून वापरले पाहिजे.'

दरवेळेस काही गैरसमज निर्माण झाल्यावर लोक म्हणतात, 'चला,बसून,बोलू या.' या ‘बोलू या’ ने काम होत नाही. आपण कधीही बोलत बसू नये. झाले गेले सोडून द्या आणि पुढे चला, बस्स! बसून भूतकाळावर चर्वीचरण करू नका. भुतकाळाबाबत कोणतेही स्पष्टीकरण मागू नका. जेव्हा एखादी चूक घडते तेव्हा ती चुकून होते, बस्स, येवढेच! त्याला सोडून तुम्ही पुढे जायला पाहिजे.

अशी कल्पना करून बघा की तुमच्या हातून काही प्रमाद घडला आणि कोणीतरी तुम्हाला त्या चुकीचे सतत स्पष्टीकरण विचारत आहे. कायम कोणालातरी कारण सांगायचे, सतत आपल्या चुकीबद्दल खुलासा द्यायचा याचे किती ओझे होईल. दुसऱ्याला अपराधीपणा कधीही वाटू देऊ नका. हे अतिशय महत्वाचे आहे. ज्याला कोणाला तुम्ही अपराध्यासारखे वाटायला लावलं तो कुठेतरी आतून तुमचा मित्र उरणार नाही. मैत्रीचा बंध सैल पडेल.

एखाद्याला अपराधीपणा न वाटता त्याची चूक निदर्शनास आणून देणे हे एक कौशल्य आहे. परंतु सर्वसामान्य माणसाची प्रवृत्ती ही कोणालातरी अपराध्यासारखे वाटायला लावणे आणि त्यातून आनंदित होणे आहे. या आपण सर्वसामान्य प्रवृत्तीच्या वर उठायला पाहिजे, आणि कोणालाही अपराधीपणा वाटू देता कामा नये. आणि मग तुमच्या नात्याची वीण ही अधिक घट्ट होईल.

स्त्रियांसाठी एक आणि पुरुषांसाठी एक गुपित आहे. जर तुम्ही यावर विचार केला तर हे उपयोगी पडू शकेल. स्त्रियांसाठी गुपित आहे की कधीही पुरुषाच्या अहंला पायदळी तुडवू नका.

संपूर्ण जगाला म्हणू दे की या भल्या गृहस्थाला डोके नाहीये परंतु त्याच्या पत्नीने कधीही असे म्हणता कामा नये. तिने नेहमी असे म्हटले पाहिजे,'तुम्ही या ग्रहावरचे सर्वात बुद्धिमान माणूस आहात. जर का तुम्ही तुमचे डोके वापरत नाही तर काय झाले याचा अर्थ असा नाही की तुम्हाला अक्कल नाही!'

तिने नेहमी त्याच्या अहंला फुगवावे. हे फार फार महत्वाचे आहे.

जर स्त्री तिच्या जोडीदाराला सांगत राहिली की, 'तुम्ही कुचकामी आहात, तुम्ही तर एकदम पालापाचोळा आहे', तर तो खरोखर तसाच होऊन जाईल.

आता पुरुषांकरिता गुपित-एका पुरुषाने बायकांच्या भावनांना दुखवू नये. ती तिच्या भावाची, आईची किंवा कुटुंबाची तक्रार करेल परंतु तुम्ही या वरातीत सामील होऊ नका. ज्याक्षणी तुम्ही तिच्या तक्रारीला संमती दर्शक मान डोलवाल, त्याक्षणी ती फिरेल. तिच्या तक्रारी सोडून ती तुमचीच तक्रार सुरु करेल. तिची गाडी उलट्या दिशेने फिरेल.

आणि तिला जर कोणत्या धार्मिक कार्यक्रमाला, तीर्थाटनाला,सिनेमाला किंवा खरेदीला जायचे असेल तर संमती द्या आणि सोबत क्रेडिट कार्डदेखील देऊन टाका!

जोपर्यंत तुम्ही स्त्रियांच्या भावनांना लाथाडणार नाही तोपर्यंत सगळे ठीक राहील.

आता दोघांकारिता-जोडीदाराच्या प्रेमाचा पुरावा मागू नका.

'तुझे माझ्यावर खरोखर प्रेम आहे,'असे विचारू नका. कोणावरही तुमच्यावर असलेल्या तिच्या/त्याच्या प्रेमाचा पुरावा सदर करण्याचे ओझे टाकू नका. तुम्हाला समजते आहे का मी काय म्हणतो आहे ते?

जर तुम्हाला त्यांच्या प्रेमामध्ये कमतरता भासत असेल तर असे म्हणा,'माझ्यावर तुम्ही इतके अफाट प्रेम का करता?' 'तुझे माझ्यावर अजिबात प्रेम नाही', आणि या प्रकारची वाक्ये म्हणू नका.

प्रश्न : जर कोणी आपल्याला डिवचत असेल तर आपण शांत राहावे का त्याला धडा शिकवावा? जर आपण शांत राहिलो तर त्यांना तो आमचा कमजोरपणा वाटतो आणि जर आम्ही त्यांना धडा शिकवला तर ते म्हणतात की आमची काहीही अध्यात्मिक प्रगती झालेली नाही.

श्री श्री : जर कोणाला धडा शिकवायचा असेल तर तुम्ही शांत असणे जरुरी आहे. जर तुमच्यात संताप असेल,जर तुम्ही अस्वस्थ असाल,तर तुम्ही कोणाला धडा शिकवू शकत नाही.

त्याचप्रमाणे, तुम्ही सतत तुमचा दुसरा गाल पुढे करण्याची गरज नाही.

धडा जरूर शिकवा पण अनुकंपेने. यामुळे तुम्हाला बळ मिळेल.

जेव्हा तुम्हाला समोरच्याची परिस्थिती समजेल आणि तो तुम्हाला का चीथोवतो आहे ते समजेल,तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर शांत आणि अविचालीततेने व्यवहार करू शकाल.

प्रश्न : आपल्या सभोवती सतत नकारात्मकता पसरवणाऱ्या लोकांना आम्ही कसे हाताळावे?

श्री श्री : सर्वात प्रथम हे लक्षात ठेवा की कोणीही सतत कायम नकारात्मकता पसरवू शकत नाही. दुसरे म्हणजे त्याला कौशल्याने हाताळा.

तिसरे म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करा.

प्रश्न : कृपा करून अशी परिस्थिती मी कशी हाताळू याबाबत तुम्ही स्पष्टीकरण द्या. मी एका व्यक्तीवर विनाअट प्रेम करतो परंतु ती व्यक्ति मला गृहीत धरून चालते. या दुःखाला मी कसे हाताळू?

श्री श्री : अरे,ते तुम्हाला गृहीत धरून चालतात का? ते तुमच्या प्रेमाच्या बदल्यात प्रेम देत नाही का? ते तुमच्यावरचे प्रेम व्यक्त करीत नाही,ही समस्या आहे का? त्यांच्या प्रेमाबाबत प्रश्न करू नका. जर तुम्हाला असे दिसून आले की ते तुमच्यावर प्रेम करीत नाहीयेत तर 'तुम्ही माझ्यावर प्रेम करीत नाही', असा आरोप करण्यापेक्षा त्यांना विचारा,'तुम्ही माझ्यावर इतके प्रेम का करता?'

जरा कल्पना करून बघा की तुम्ही त्यांच्यावर दया दाखवत नाही,तुम्ही त्याचबरोबर स्नेहपूर्ण नाही, तुम्ही मैत्रीपूर्ण नाही असे कोणीतरी सतत तुमच्यावर आरोप लावीत आहे तर तुम्हाला कसे वाटेल?

 (उत्तर: आम्हाला आमची वारंवार कानउघाडणी होत आहे असे वाटेल)

हो ना! मग आता तुम्हाला समजले की तुम्ही दुसऱ्याला कसे वागवता ते? कळले?

सतत तक्रार करणाऱ्या माणसाची संगत कोणालाही नकोच असते. वारंवार कानउघाडणी करणाऱ्या,आणि ज्याला तुम्हाला स्पष्टीकरण द्यावे लागते आणि कायम तुमच्या प्रेमाचा पुरावा सादर करावा लागतो अशा माणसाची संगत कोणाला आवडेल? नाही ना! याचे किती ओझे होईल आणि हे किती कंटाळवाणे होईल!

चांगली संगत ती आहे ज्यामध्ये चैतन्य प्रोत्साहित होते. जर कोणाची चांगली मनःस्थिती नसेल तर ते म्हणतील,'अरे,चल! झाले गेले ते विसर आणि आता आगेकूच कर'. 

ज्याच्यामध्ये उत्साह आहे,जो तुम्हाला नेहमी पुढे जाण्यास प्रोत्साहित करतो त्याची संगत चांगली आहे. कोणीतरी तुम्हाला स्पष्टीकरण मागतो,संशय व्यक्त करतो आणि प्रश्न करतो त्याची संगत चांगली नाही. म्हणून कधीही कोणाच्या तुमच्यावर असलेल्या प्रेमावर संशय घेऊ नका. प्रश्न किंवा तक्रार कधीही मुळीच करू नका. आगेकूच करा!

प्रश्न : भारतात डी आर्ट ऑफ लिविंग धरून अनेक संस्था आहेत ज्या योग आणि ध्यान शिकवतात. जर आपण सगळे एकच उदेश्याकरिता,ते म्हणजे समस्त मानव जातीमध्ये शांती प्रस्थापित करणे तर मग या सगळ्या संस्थामध्ये इतका फरक का आहे?

श्री श्री : हे बघा, समउदेश्य असणारे लोक हे नेहमी एकत्र येतात. हेतू समान असल्यामुळे जरी पद्धतीमध्ये भेद असला तरी तंटे उद्भवत नाहीत.

तुम्हाला माहिती आहे देवाला विविधता अतिशय आवडते.

जेव्हा मी पाकिस्तानला गेलो होतो तेव्हा लोकांनी मला विचारले की,'भारतात इतके देवदेवता का आहेत? देव तर एकच आहे.'

तेव्हा मी त्यांना म्हणालो,'एकच गव्हापासून तुम्ही इतके वेगवेगळे पदार्थ का बनवता? देवाने येवढ्या प्रकारच्या भाज्या बनवल्या.त्याने फक्त वांगे बनवून ,'आता जन्मभर हेच खा', असे म्हटले नाही.' भाज्या आणि फळे यातील देवाने निर्माण केलेली विविधता बघा. आहे ना? ती तर आहेच! भारतामध्ये अनेक देव आहे परंतु परमात्मा (सर्वोच्च चेतना)हा एकच आहे. अनेक नाम आणि रूपे असलेला एकच देव. तोच तर उत्सव साजरा करणे आहे.

सगळे किती निरनिराळे रंग घालून आलेल आहेत बघा. जर सगळ्यांनी एकच गणवेश घातला असता तर ही तर लष्कराची छावणी वाटली असती! समजले?

विविधता हे निर्मितीचे सौंदर्य आहे आणि त्याचा आपण मान ठेवला पाहिजे.

जेव्हा मी हे सांगितले तेव्हा त्यांना ते खुपच आवडले आणि ते म्हणाले,'याआधी कोणीही आम्हाला याप्रकारे समजावले नाही!'

प्रश्न : एका व्यक्तीचा देवावर विश्वास आहे परंतु तो फसवतो आणि चोऱ्यामाऱ्या करतो. दुसऱ्याचा देवावर विश्वास नाही परंतु तो कधीही फसवत नाही. कोण बरोबर आहे?

श्री श्री : तुमच्या प्रश्नाचे तुम्हीच उत्तर दिले आहे!

हे तर मला असे विचारण्यासारखे आहे,' मी एका ताटामध्ये कोळसा ठेवला आहे आणि दुसऱ्या ताटामध्ये लोणी. तुम्हाला काय आवडेल?' हे तर एकदम स्पष्ट आहे.

जर कोणाचा देवावर विश्वास आहे तर तो दुसऱ्यांना कसे काय फसवू शकतो? हेच मला कळत नाही. नाहीतर हे असे असेल की दुसऱ्यांना फसवल्यामुळे त्याची सदसद्विवेकबुद्धी त्याला सतत टोचण देत राहील आणि तो कायम देवाकडे क्षमेची याचना करीत असेल. 

फसवणारा माणूस हा अज्ञानामध्ये अडकलेला असतो. तिथे भव्यता नसते. त्याच्यामध्ये कुठेतरी भीती असते आणि म्हणूनच तो अशा गोष्टी करीत असतो.

प्रश्न : माझ्या मित्रांपैकी एक वेडा झाला आहे. तो आठवड्याचे सात दिवस आणि दिवसाचे चोवीस तास काम करतो. त्याच्या आई वडिलांना समजत नाहीये की काय करावे. मला कळत नाही की काय करावे.

श्री श्री : आजकाल असे वरचे वर घडताना मला दिसते. समवयस्क लोकांचा दबाव, परीक्षेत चांगले गुण आणण्याचा दबाव हे फार तीव्र आहेत. म्हणून ते दिवस न् रात्र वाचन करतच राहतात.

एक तरुण माझ्याकडे आला आणि त्याने मला सांगितले की तो त्याच्या टेबलावर चार मोठे दिवे लावून वाचन करतो आणि तो दिवस न् रात्र अभ्यास करीत राहतो. तुम्ही तुमच्या मेंदूचा इतका अतिरेकी वापर नाही करू शकत. मग अचानक काहीतरी होते आणि मेंदूचा खटका उडतो!

योग आणि ध्यान यांचा नियमित सराव करा. कधीतरी एकदा करणे पुरेसे नाही. असे सगळे मुद्दे YES + च्या टेबलावर ठेवा.