भगवान कृष्ण - प्रेमाचे प्रतिरूप

10
2012
Aug
बंगलोर
आज भगवान श्रीकुष्ण यांची जन्मतिथी आहे आणि संपूर्ण भारतभर सगळे लोक ती साजरी करीत आहेत.

भगवान श्रीकृष्ण म्हणाले,'मी कधीही जन्मलो नाही आणि कधीहि मृत्यू पावू शकत नाही. मी अजन्मा (जो कधीही जन्माला येऊ शकत नाही) आहे.' जो कधीही जन्माला येऊ शकत नाही त्याची जन्मतिथी साजरी करणे अतिशय रोचक आहे.

भगवान कृष्ण म्हणून जन्माला येण्याआधी भगवान कृष्ण यांनी एक पूर्वजन्म घेतला होता. पूर्वजन्मामध्ये त्यांना कपिल मुनी (ज्ञानी साक्षात्कार असलेला साधू) असे ओळखत असे. कपिल मुनी या अवतारामध्ये भगवान कृष्णाने आपल्या आईला आत्मज्ञान,सांख्य योगाचे ज्ञान देऊ केले. तर त्याचा भगवान कृष्ण म्हणून अवतार घेण्याआधी कपिल मुनी हा अवतार झाला.

आता आईची माया अशी असते की तिला आपले मुल प्रत्येक जन्मी आपल्या पोटी जन्माला येऊन पाहिजे असते. म्हणून तिला जरी आत्मज्ञान मिळाले तरी तिची आपल्या मुलाबरोबर नाळ जोडलेलीच राहिली.म्हणूनच पुढच्या जन्मी ती पुन्हा भगवान श्रीकृष्णाची आई यशोदा म्हणून जन्माला आली आणि भगवान श्री कृष्ण यांनी पुन्हा एकदा जन्म घेतला.

कपिल मुनी बनून त्यांनी स्वतःच्या आईला आत्मज्ञान देऊ केले परंतु भगवान श्रीकृष्ण म्हणून त्यांनी तिला भरपूर प्रेम आणि माया दिली आणि आत्मज्ञान नाही.

अशा प्रकारे एका जन्मामध्ये त्यांनी तिला केवळ ज्ञान देऊ केले आणि दुसऱ्या जन्मामध्ये त्यांनी फक्त प्रेम दिले. त्यांनी यशोदेला कोणत्याही प्रकारचे आत्मज्ञान दिले नाही. ते खेळले आणि यशोदेच्या भरपूर खोड्या काढल्या. म्हणून आज खोड्या काढायचा दिवस आहे!(हशा)

ज्ञान,प्रेम आणि खोडकरपणाचा मिलाफ असलेला जन्म म्हणजे भगवान श्री कृष्ण यांचा जन्म अथवा अवतार होय. म्हणून भगवान कृष्णाच्या जन्मदिवशी तुम्ही सर्वानी भगवद गीता वाचण्याचा संकल्प (शपथ अथवा वचन)घ्या . इथे जमलेल्यांपैकी कितीजणांनी आत्तापर्यंत भगवद गीता वाचलेली नाही? (बऱ्याचजण हात वर करतात) बघा! चला आता एक गोष्ट करुया. आजपासूनच आपण गीता वाचन सुरु करू या. सोप्या भाषांतरासहित वाचा आणि जितकी समजून घेता येईल तितकी समजून घ्या. जर तुम्हाला समजली नाही तरी हरकत नाही,पण निदान एकदा तरी नक्कीच वाचा. तुम्हाला जे काही समजेल ते चांगलेच असेल.

समग्र भगवद गीता एकच बसणीला समजेल अशी अपेक्षा ठेवू नका. आयुष्यभर तुम्ही वाचा आणि गीतेची पाने पुनःपुन्हा चाळत राहा, तेव्हा जाऊन तुम्ही ती पूर्णपणे समजून घेऊ शकाल.

ज्यानुसार मन आणि बुद्धीच्या पक्वतेची पातळी वाढत जाईल, त्यानुसार आपले भगवद गीतेचे आकलन वाढत जाईल.

म्हणून आजचे कृत्तिका नक्षत्रसुद्धा हे अतिशय तेजपुंज आणि सक्रीय असते. आज शुक्रवार आहे ,अष्टमी सुद्धा (हिंदू कालगुनेनुसार महिन्याचा आठवा दिवस जो फार शुभ समजल्या जातो)आहे आणि आज जन्माष्टमीसुद्धा आहे. या सगळ्याचे एकत्र येणे खुपच खास आहे.

भगवन कृष्ण म्हणतात,'सेनानीनां अहं स्कंदः'-सैन्याच्या सेनापतींमध्ये,मी कार्तिकेय आहे.(कार्तिकेय हा सैन्यांचा सर्वात प्रबळ सेनापती होता.)

मुनींमध्ये(ज्ञानी साधू महात्म्यांमध्ये) मी कपिल मुनी आहे.

ऋषींमध्ये मी वेद व्यास आहे.

पांडवांमध्ये मी अर्जुन आहे.

जर कोणी भगवद गीतेचा दहावा अध्याय वाचला असेल तर त्यांना अगदी योग्य अद्वैताचे ज्ञान (आत्म्याचे अद्वैत असण्याचे तत्वज्ञान,सगळ्यांमध्ये एकालाच अनुभवणे)

याला अनुभूती योग म्हणतात. माणसाला विभूतीची ईश्वरी देणगी मिळते.

विभूतीचा अर्थ कपाळावर फसल्या जाणारे भस्म असा नाही. विभूतीचा चमत्कार असा देखील अर्थ आहे. भगवान कृष्णाच्या जीवनात अनेक चमत्कार झाले. परंतु त्याचवेळेस त्याला एक वरदानदेखील मिळाले होते, किंबहुना तो एक प्रकारे एक शापच होता.ज्याक्षणी एखादा चमत्कार घडायचा तेव्हा लोक लगेचच त्याबद्दल जवळ जवळ एक वर्ष विसरून जायचे.

तर, उदाहरणार्थ, जर आज एखादा चमत्कार घडला तर सगळे त्याबद्दल विसरून जायचे आणि एका वर्षानंतर त्यांना तो चमत्कार आठवायचा! असे काही तुम्ही ऐकले आहे का?

याचा उल्लेख श्रीमद भागवत (विष्णूचे अवतार खास करून श्रीकृष्णाच्या भक्ती (धार्मिक निष्ठे)वर मुख्य लक्ष्य केंद्रित करणारे संस्कृत वाङ्मयीन पाठ्य)या मध्ये आहे.

असे म्हणतात की भगवानाच्या भव्य दिव्य अविष्काराचे साक्षी राहिल्यानंतर पुढच्या क्षणाला लोक विसरून जायचे. म्हणून जेव्हा भगवान कृष्णाने कालिया (अनेक शीर्षे असलेला नाग)मर्दन केले, तेव्हा ते बघून लोक आपापल्या घरी परतले, सगळे या चमत्काराबद्दल विसरले आणि पुन्हा आपल्या कामाला लागले जणू काही झालेच नाही. त्याचे चमत्कार हे विसरले जाणारच आणि एका वर्षानंतर त्याची स्मृती होणार हे विधिलिखित होते. काही जण म्हणतात की हे वरदान होते आणि काही जण म्हणतात की हा भगवान ब्रह्मदेवाचा (पवित्र त्रिमुर्तीमधील सृष्टीकर्त्याचा)शाप होता की जेव्हा कधीही चमत्कार घडेल तेव्हा लोकांच्या स्मृतीवर पडदा पडेल.

तर जेव्हा कधीही गोकुळावर (भगवान कृष्णाच्या गावावर) संकट यायचे,तेव्हा लोक एकत्र जमा होऊन ,'ॐ नमःशिवाय' चा जप करायचे आणि त्यांच्या लहानग्या कृष्णाला वाचवण्याची आणि त्याला कोणताही धोका उत्पन्न होण्यापासून वाचवण्याची अशी भगवान नारायणा(भगवान विष्णू) ची प्रार्थना करायचे.

तर वृंदावनात सगळे यदुकुल नंदन (यदु वंशाचा वंशज,म्हणजेच भगवान कृष्ण)याच्या सुरक्षतेसाठी प्रार्थना करायचे आणि 'ॐ नमःशिवाय' चा जप करायचे. ते भगवान शिव यांनादेखील लहानग्या कृष्णाच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याच्या कुशल मंगलतेकरिता प्रार्थना करत. आणि मग सगळे चमत्कार घडले, मग तो शक्तासुराचा वध असो वा पुतनेचा (बाळकृष्णाला ठार मारण्याकरिता कृष्णाच्या मामा कंसाने पाठवलेली राक्षसीणीचा) वध असो;लोक हे सगळे काही सेकंदाच्या आत विसरून जायचे आणि त्यांना ते एका वर्षानंतरच आठवायचे. याच्या परिणामस्वरूप लोक भूतकाळातील घटनांबद्दल बोलत राहायचे. अशी आहे श्रीमदभागवत कथा.

श्रीमदभागवत कथेनुसार भगवानाचा काळ हा मौजमजा, बागडणे, आनंद, प्रेम आणि निष्ठेने युक्त होता असे दिसून येते. परंतु या बरोबरच त्यात बरेच वैराग्य (इच्छाहीनता) सुद्धा होते. 

जर तुम्हाला वैराग्य समजून घ्यायचे असेल तर श्रीमदभागवत वाचा. म्हणूनच श्रीमदभागवत मध्ये वैराग्य (इच्छाहीनता) आणि अनुराग(प्रेम);ज्ञान आणि निष्ठा यांचा विरोधाभासयुक्त परंतु अत्यंत दुर्मिळ आणि विलक्षण असा मिलाफ आढळतो.

तर भगवान कृष्ण हे आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. पण भगवान कृष्णाबरोबर होत भगवान बलराम(भगवान कृष्णाचे वडील बंधू) आणि ते प्रचंड शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतिक आहेत. लोकांना प्रचंड शक्ती जास्त करून भीती वाटते. जिथे कुठे आकर्षण आणि प्रेम असते तिथे नेहेमी अशक्तपणा किंवा असहायता दिसून येते. प्रेम म्हणजे मोठी ताकद जरी असली तरी त्यामुळे एखाद्याला दुर्बलता जाणवू शकतो. आणि जर एखाद्याने प्रेमामुळे उद्भवणारा केवळ दुर्बलता पाहिला की मग ते प्रेमापासून दूर पळून जातात. मग त्याचे रुपांतर तिरस्कारामध्ये होते.

तर भगवान कृष्ण हे आकर्षणाचे केंद्रबिंदू आणि प्रेमाचे कारंजे आहेत तर भगवान बलराम प्रतिष्ठा आणि सामर्थ्याचे प्रतिक आहेत. ते दोघे नेहमी एकत्र असतात.

भगवान कृष्ण तर राधेशिवाय असूच शकत नाहीत. म्हणूनच प्रेमामध्ये दुर्बलता असते असे मी म्हणालो. राधा ही शक्ती आहे, राधा कोणी व्यक्ति नव्हती. ती भगवान श्रीकृष्णाच्या शक्तीचे ,प्रेमाच्या शक्तीचे प्रतिक आहे. आणि जिथे कृष्ण जाईल तिथे भगवान कृष्णासोबत चालणाऱ्या शक्तीचे प्रतिक आहे भगवान बलराम. असे म्हणतात ,'निर्बल के बलराम '. ज्याप्रमाणे भगवान राम दुर्बल आणि असहाय्य लोकांना आसरा देतात, त्याचप्रमाणे भगवान बलराम भगवान कृष्णाच्या सामर्थ्याची खुण आहे आणि ते नित्य कृष्णाच्या सोबत असतात.

जिथे कुठे प्रेम असते तिथे अभिलाषा ही असतेच. जिथे कुठे अभिलाषा असते तिथे प्रेम हे नक्कीच हजर असतेच. अभिलाषा आहे म्हणून प्रेम उपस्थित आहे. त्याचप्रमाणे प्रेमामुळे प्रचंड शक्तीदेखील येते.

भगवान बलराम याने खूप वेळा पृथ्वीची प्रदिक्षणा केली आणि पृथ्वीच्या प्रत्येक भागाबरोबर त्याने स्वतःला जोडले. परंतु भगवान कृष्ण जिथे होते तिथेच राहिले आणि त्यांनी स्मितहास्य केले आणि संपूर्ण पृथ्वीने कृष्णाभोवती प्रदिक्षणा केली. एखाद्याला शक्ती कमावण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते, पण प्रेमाकरिता कोणालाही कुठेही जाण्याची अगर काहीही करण्याची जरुरत नाही. तुम्ही जिथे कुठे आहात तिथे तुम्ही प्रेमात आकंठ बुडून राहू शकता.

भगवान बलराम हे यत्न आणि मेहनतीचे प्रतिक आहेत, तर भगवान कृष्ण हे संपूर्ण आरामाचे द्योतक आहेत. अशा संपूर्ण आरामामध्ये तुमच्यात प्रेमाचा उदय होतो.

प्रेम हे प्रयत्न केल्याने प्राप्त होत नाही, तर काहीही न करता ते मिळते. परंतु शक्ती मिळवण्याकरिता प्रयत्न करावे लागतात आणि मेहनत करावी लागते. काहीही न करता रिकामे बसल्याने भव्य शक्ती प्राप्त होत नाही. कोणत्याही क्षेत्रात योग्यता आणि विशेष श्रेष्ठत्व मिळण्यासाठी,तुम्हाला खूप कष्ट आणि अतिशय मेहनत घेण्याची आवश्यकता असते. जर तुम्हाला सतार वाजवण्याची इच्छा असेल तर तुम्हाला दररोज न चुकता काटेकोरपणे दोन तास सराव हा केलाच पाहिजे. जर तुम्हाला बासरी वाजवायची असेल तर तुम्हाला सराव करावा लागेल. तुम्हाला जर शरीर बलवान बनवायचे असेल तर तुम्हाला नियमित व्यायाम करावा लागेल. तर म्हणून शक्ती प्राप्त करण्याकरिता एखाद्याला प्रयत्न तर करावेच लागतात. ज्ञान मिळवण्याकरितादेखील प्रयत्न हे लागतातच. परंतू प्रेमाकरिता तुम्हाला प्रयत्न करण्याची गरज नाही. तुम्ही आराम करा आणि स्वयंमध्ये विश्राम करा.

भगवान कृष्ण म्हणतात, 'धर्मविरुद्धो भुतेशु कामोस्मिभारतरशभा.' तुमच्यात उद्भवणाऱ्या कामना, ज्या धर्माच्या (योग्य आचरणाच्या)विरुद्ध नाहीत, या माझ्यामुळे प्रेरित होऊन निर्माण होतात हे लक्षात ठेवा. कोणतीही कृती अथवा इच्छा जी धर्माच्या विरुद्द आहे त्यात मी नाही. हे फार आश्चर्यकारक आहे.

जर तुम्ही धर्मानुसार वागता आणि स्वधार्मानुसार (शास्त्रानुसार तुमच्या जबाबदाऱ्या)कर्मे करीत असाल तर तुमच्यात जागणाऱ्या योग्य कामना यांचा जनक मी (भगवान कृष्ण) आहे.तुमच्यात निर्माण सगळ्या सत्वशील इच्छांचे स्रोत्र मी आहे. हे किती विस्मयकारक आणि अनन्यसाधारण आहे.

तो म्हणतो,'मी बलवानांचे बळ आहे; तुम्ही जे सौंदर्य पाहता त्या सगळ्याचे सुंदरतासुद्धा मी आहे. कोणताही प्रत्येक चांगला गुण जो तुम्ही दुसया माणसात पाहता तो माझ्याकडूनच येतो.' तो असे का म्हणतो आहे? याचे कारण असे की मन हे कुठेही दिसणाऱ्या सुंदरतेकडे धाव घेत असते. जर एखाद्याकडे पुष्कळ धन किंवा खूप शक्ती असेल तर मन तिथेच धाव घेत राहते.तर अशा मनाला पकडून स्वयंमध्ये पुन्हा केंद्रित करण्यासाठी, भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतो, 'तू जे काही बघतो त्या सगळ्यामध्ये तू केवळ मला पहा. ज्या कशामध्ये किंवा जिथे कुठे किंवा कोणत्याही व्यक्तीमध्ये जर तुला महानता दिसत असेल तर ती माझ्यामुळे आहे, त्या सगळ्या मागची शक्ती मी आहे आणि मी थेट इथे आहे.'

दोलायमान असणाऱ्या आणि इथे तिथे भटकणाऱ्या मनाला हुडकून गोळा करून आणि त्याचे लक्ष्य पुन्हा आत्म्यावर जो योगेश्वाराचे (भगवान श्रीकृष्णाचे)शक्तीस्थान आहे त्यावर केंद्रित केले तर त्याने विभूती (चमत्कारी रहस्य) मिळते ज्यामुळे परिपूर्णता(सिद्धी) प्राप्त होते.

भगवान श्रीकृष्ण देवीचे (दिव्य मातेचे) पूजन करायचे. याचा उल्लेख दुर्गा सप्तशती (मार्कंडेय पुराणातील ७०० श्लोकांची दिव्य मातेची स्तुती करणारी मालिका) यामध्ये केलेला आहे. 

तुमच्यापैकी कितीजणांनी हे ऐकले आहे?

'रूपं देही जयं देही यशो द्विशो जाही' हे श्लोक दुर्गा सप्तशतीमधील अर्गला स्तोत्रामधील आहेत ज्याचे उच्चारण केले असता त्याचे कवच (चिलखत किंवा ढाल) बनते.

असे म्हणतात ,'कृष्णेन समस्तुत्य देवी शाश्वद भक्त्या तथाम्बिके,रूपं देही जयं देही यशो देही द्विशो जाही.' याचा अर्थ असा की,'हे देवी (दिव्य माते) जिचे पूजन चिरंतन भक्तीने भगवान कृष्ण करतात, आम्हाला रूपाचा(रूपं), विजयाचा(जयं), यशाचा(यशं) आशीर्वाद दे आणि आमच्यातील सर्व लालसा आणि अज्ञानाचा (द्विशो) नाश कर.'

ही प्रार्थना आहे. कवच अर्गला कीलकं यातील हे तीन श्लोक आहेत.

जर तुम्ही बघाल तर ती देवी आहे जी खरे तर भगवान कृष्णाला वाचवते. यशोदेच्या पोटी देवीचा सुद्धा अष्टमीला जन्म झाला होता. आणि त्याच दिवशी तिला मथुरेला नेले होते. कंसाने तिला पकडून ठार करण्याचा प्रयत्न केला परंतु ती त्याच्या हातातून निसटली.

इथे कंस अहंकाराचे (मीपणाचे) द्योतक आहे, भगवान कृष्ण आनंदाचे (परमानंदाचे) प्रतिक आहे आणि देवी किंवा दुर्गा ही आद्यशक्तीचे (आपल्यातील आदिकालीन उर्जा किंवा चेतन शक्ती)

अहंकार चेतन शक्तीला किंवा आदिकालीन उर्जेला (देवीला) पकडू शकत नाही आणि परमानंदालासुद्धा(असा आनंद जो कृष्ण आहे त्याला) धरू शकत नाही.

म्हणून मग दैवी चैतन्या (देवी)ने एक भविष्यवाणी केली की अहंकाराला (कंसाला) नष्ट करण्याचे परमानंदाचे (कृष्णाचे) विधिलिखित आहे आणि तो अगोदरच जन्माला आलेला आहे.

जेव्हा जीवन आनंदाने (परमानंदाने) ओतप्रोत होते तेव्हा अहंकार नाहीसा होतो. जेव्हा एखाद्याला परमानंदाची प्रचीती येते तेव्हा तिथे अहंकार उरत नाही. परंतु जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत माणसाला यातना सहन कराव्या लागतात आणि माणूस दयनीय राहतो. तो कुठल्या न कुठल्या कारणाने दुःखी राहतो आणि कोणाला न कोणाला दोषी मानत राहतो. तरीसुद्धा अहंकार चैतन्याला नष्ट करू शकत नाही कारण चैतन्य हे चिरंतन आहे.

चैतन्याची शक्ती कशामुळेही नष्ट होत नाही आणि कमीही होत नाही. ती अविरत आणि चिरंतन आहे. ज्यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास केला आहे त्यांना हे चांगल्या प्रकारे माहित आहे की उर्जा ही निर्माण करता येत नाही किंवा ती नष्टही करता येत नाही. तसेच चेतना ही निर्माण करता येत नाही आणि ती नष्टही करता येत नाही. ती (आदिकालीन) उर्जा निर्माण अगर नष्ट करण्याचे कोणतेही प्रयत्न हे निष्फळच होतील.

जर तुम्ही वरवर बघितले तर तुम्हाला ही केवळ एखादी कहाणी आहे असे भासेल. पण तुम्ही जर खोलवर खोदत गेलात तर तुम्हाला असे विस्मयकारक ज्ञान त्यात लपलेले सापडेल.

भगवान कृष्णाचा जन्म कारागृहात झाला होता. त्याचा जेव्हा जन्म झाला तेव्हा पहारा देत असलेले सगळे पहारेकरी झोपी गेले. पहारेकरी कोण होते? ते आपल्या जाणीवांचे प्रतिक आहेत-जेव्हा आपल्या जाणीवा, ज्या कायम बहिर्मुख असतात त्या जेव्हा शांत होतात म्हणजेच जेव्हा आपण अंतर्मुखी होतो आणि तेव्हाच अंतर्मुखी होण्यातून उद्भवणाऱ्या परमानंदाची आपल्याला अनुभूती मिळते.

या कहाण्यांचा खोलवर विचार करा आणि त्यांचे विश्लेषण करा, आणि अद्भूत ज्ञान आणि प्रेम हे दोन्ही तुम्हाला उपलब्ध झालेले तुम्हाला दिसून येईल.

भगवान कृष्ण म्हणाले, 'तुम्ही तुमच्या स्वतःच्या पापांपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही.मी तुमची तुमच्या पापांपासून सुटका करेन.'

असे बघा,एखादी व्यक्ति जे सगळे काही करते-उपास, तीर्थाटन, प्रायश्चीत्त इ.इ.,हे सगळे ती व्यक्ति स्वतःची पापांपासून सुटका मिळण्यासाठी करत असते.

म्हणून भगवान कृष्ण म्हणतात,'अहं त्वं सर्व-पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा सुचः.'

ते म्हणतात,'तुम्हाला केवळ एकच गोष्ट करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही सगळे मला समर्पण केले पाहिजे आणि माझ्यामध्ये आश्रय घ्या.'

ते म्हणतात, 'या आणि माझ्यामध्ये आश्रय घ्या', तर ही त्यांची पहिली अट आहे. आणि मग भगवान म्हणतात, 'मी तुम्हाला तुमच्या पापांपासून सुटका देईन. ते माझे काम आहे.'

तर तुमचे इतकेच काम आहे की तुम्ही त्याच्या संरक्षणाच्या छत्राखाली या आणि त्याचा आश्रय घ्या आणि तो तुम्हाला तुमच्या सर्व पापांपासून मुक्त करेल. या बोलण्यातच त्याने सगळे सांगितले. यातच सकल पूर्णत्व आहे. मला वाटते की आपण सगळ्यांनी भगवान श्रीकृष्णाचे हे शब्द सगळीकडे उपलब्ध करून देऊ या. आपण असे करत नाही आणि त्याऐवजी आपण आजूबाजूच्या अनेक गोष्टी ऐकत बसतो. खास करून,'या आणि माझ्यामध्ये आश्रय घ्या. मी तुम्हाला तुमच्या सगळ्या पापांपासून सुटका देईन..'

आपल्या देशात ज्या प्रकारे धर्मांतरण सुरु आहे ते थांबवण्याकरिता हे इतकेच पुरेसे आहे. भगवान कृष्णाने अगदी हेच सांगितले आहे.