रक्षा बंधन

01
2012
Aug
बंगलोर
 आज आहे पौर्णिमा-श्रावण पौर्णिमा . याच्या आधीची पौर्णिमा होती गुरु पौर्णिमा, गुरु आणि शिक्षक यांना समर्पित. त्याच्या आधी होती बुद्ध पौर्णिमा आणि त्याच्यासुद्धा आधी होती चैत्र पौर्णिमा.

तर या चौथ्या पौर्णिमेला श्रावण पौर्णिमा म्हणतात आणि ही पौर्णिमा भावा-बहिणीच्या नात्याला समर्पित आहे-रक्षा बंधन.

आजचा दिवस हा जानवे बदलण्याचासुद्धा दिवस आहे. तुमच्या खांद्यांवर तीन जबाबदाऱ्या अगर कर्ज आहेत याची आठवण ठेवणे असे जानवे बदलण्याचे महत्व. तीन जबाबदाऱ्या म्हणजे तुमची तुमच्या पालकांच्या प्रति, समाजाच्या प्रति आणि ज्ञानाच्या प्रति.

ह्या आपल्या तीन जबाबदाऱ्या अगर आपली तीन कर्ज आहेत. आपल्यावर आपल्या पालकांचे उपकार आहेत, समाजाचे उपकार आहेत आणि आपल्यावर गुरुचे;ज्ञानाचे उपकार आहेत. तर आपल्यावर ही तीन कर्जे आहेत आणि जानवे या तीन जबाबदाऱ्यांची आठवण करून देते.

जेव्हा आपण कर्ज असा उल्लेख करतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की आपण काही घेतले आहे आणि ते आपण परत करणे जरुरी आहे. परंतु इथे आपण जबाबदारी म्हणून समजणे योग्य आहे. या संदर्भात कर्जाचा अर्थ काय होतो? जबाबदारी असा! तुमची आधीच्या पिढीच्या प्रति असलेली जबाबदारी, पुढच्या पिढीच्या प्रति असलेली जबाबदारी आणि वर्तमान पिढीच्या प्रति असलेली जबाबदारी याबाबत पुनरावलोकन करणे. आणि म्हणूनच तुम्ही हे दोऱ्याचे तीन पदर (जानवे) खांद्यावर घेता.

मला माझे शरीर शुद्ध, माझे मन निर्भेळ आणि माझी वाणी पवित्र ठेवू दे- हे याचे महत्व आहे. शरीर, मन आणि वाणी यांची शुद्धता. आणि जर तुमच्या भोवती दोरा लोंबत असेल तर तुम्हाला दररोज आठवण राहते, 'अरे मला या जबाबदाऱ्या आहेत.'

प्राचीन काळी स्त्रियांना देखील जानवे घालावे लागत असे. हे एक किंवा दोन जाती पुरते मर्यादित नव्हते. ते ब्राह्मण असो वा क्षत्रिय, वैश्य वा शुद्र सगळ्यांना ते घालावेच लागत असे; परंतु मागाहून ते थोड्यांकरीताच सीमित झाले.

जबाबदारी ही सर्वांकरिता आहे.

आता जर कोणाचे लग्न झाले तर त्यांना सहा पदराचे जानवे मिळते- तीन पदर स्वतःचे आणि तीन पदर हे पत्नीचे सुद्धा. खरे तर स्त्रियांनीसुद्धा जानवे घालावे परंतु पुरुष ती जबाबदारी स्वतःवर घेतात. हा पुरुष प्रधान समाज आहे; त्यांनी ही फार मोठी चूक केली. प्राचीन काळी स्त्रिया देखील घालायच्या- जबाबदारी घेण्याचा समारंभ व्हायचा. परंतु आता विवाहानंतर पुरुष पत्नीच्या वाट्याचीसुद्धा जबाबदारी उचलतो.

तर रक्षा बंधन च्या दिवशी राखी बांधतात,ज्याला आता मैत्रीची फित असे म्हणतात. ही संज्ञा तर आता इंग्रजीत प्रचलित झाली, परंतु रक्षा बंधन हे प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. भावाने बहिणीचे संरक्षण करण्याचे हे बंधन आहे. म्हणून रक्षा बंधन असा उत्सव आहे ज्यात बहिणी या त्यांच्या भावाकडे जाऊन त्याला राखी बांधतात. आणि तो त्यांचा सख्खा भाऊ असणे जरुरी नाही, खरे तर त्या सगळ्यांना बांधायला लागतात आणि सगळे त्यांचे भाऊ आहेत. तर हे या देशात प्रचलित आहे आणि श्रावण पौर्णिमा हा फार मोठा सण आहे.

श्रावण पौर्णिमे नंतर येते भाद्रपद पौर्णिमा. ही देखील साजरी केली जाते. नंतर येते अनंत पौर्णिमा, जी अनंततेची पौर्णिमा आहे. आणि नंतर येते शरद पौर्णिमा. शरद पौर्णिमेचा चंद्र हा मोठा आणि सुंदर असतो. जर कोणाचा चेहरा फुललेला आणि टवटवीत दिसत असेल तर त्याला, 'तू तर एकदम शरद पौर्णिमेसारखा दिसतो आहेस.' असे म्हणतात.

शरद पौर्णिमा ही संपूर्ण वर्षभरातील सर्वात उत्कृष्ट, सर्वात मोठी आणि सर्वात सुस्पष्ट पौर्णिमा आहे. जर कोणी अतिशय आनंदायक आणि आल्हाददायक दिसत असेल तर त्याला,'शरद चंद्र निभानना' असे म्हणतात.

असे म्हणतात की देवी मातेचा चेहरा हा शरद पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आहे. म्हणून ही पौर्णिमा अतिशय मंगल आहे.

या नंतर येते कार्तिक पौर्णिमा जी तुम्ही खूप दिवे लावून साजरी करता. तर प्रत्येक पौर्णिमेला काही महत्व आहे आणि काही उत्सव त्या सोबत जोडलेला आहे.

शरद पौर्णिमेला भगवान श्रीकृष्ण गोपिकांबरोबर नाचले. तो जरी एकच होता तरी प्रत्येक गोपीला वाटायचे की तो अनेक आहे, त्यांना जणू तो अनेक पटीने वाढल्याप्रमाणे वाटायचा आणि अशाप्रकारे तो सगळ्या गोपिकांबरोबर नाचायचा. सगळे समाधिस्थ व्हायचे! आणि सगळ्यांना कृष्ण आपला स्वतःचाच आहे असे वाटायचे आणि तो सगळ्यांबरोबर नाचायचा. शरद पौर्णिमा यासाठी सुप्रसिद्ध आहे.

लोक हा दिवस साजरा करतात. ते दुधाला चंद्रप्रकाशात ठेवतात आणि नंतर मग ते दुध ते ग्रहण करतात. तर अशाप्रकारे शरद पौर्णिमा साजरी केली जाते.

जर तुम्ही तुमच्या जीवनाला उत्सव बनवू शकला नाही आणि जर तुम्ही प्रत्येक दिवस साजरा करू शकला नाही तर निदान महिन्यातले काही दिवस तुम्ही साजरे करू शकाल. आणि जर महिन्यातील काही दिवस अति होत असतील तर मग निदान महिन्यातून एकदा तरी म्हणजे प्रत्येक पौर्णिमा तुम्ही साजरी करू शकता; अशा प्रकारे वर्षातील बारा उत्सव.

मन हे चंद्राबरोबर इतके जोडलेले आहे, म्हणूनच अमावस्येला किंवा पौर्णिमेला मनात चढ उतर होतात. मन आणि चंद्र हे खुपच जोडलेले आहेत म्हणूनच वेदांमध्ये म्हटलेले आहे, 'चंद्रमा मनसो जाता'-मन हे चंद्रापासून निर्माण झालेले नाही तर चंद्र हा मनापासून निर्माण झालेला आहे.’ म्हणूनच हे दिवस अतिशय महत्वाचे आहेत. जीवनही तसेच महत्वाचे आहे. मी तर म्हणेन की संपूर्ण आयुष्य हे ज्ञानी माणसाच्यादृष्टीने महत्वाचे आहे.

म्हणून, या दिवशी जानवे बदलतात आणि ते या निश्चयाने(संकल्पाने) बदलतात की-मला अशी क्षमता मिळू दे ज्याच्या योगे मी परिणामकारक आणि किर्तीवंत कर्मे करू शकेन.

कृती करण्यास देखील क्षमतेची आवश्यकता असते. आणि जेव्हा शरीर शुद्ध असेल, वाणी पवित्र असेल आणि चेतना जिवंत असेल तेव्हा कार्य पार पडता येते.

असे म्हणतात की एखाद्याला कोणतीही कृती, अध्यात्मिक कृती किंवा प्रापंचिक कृती,करण्याकरिता कुशलतेची आणि क्षमतेची गरज आहे. आणि अशी कुशलता आणि क्षमता मिळवण्यासाठी आपण जबाबदार व्यक्ति असणे जरुरी आहे. केवळ जबाबदार माणूसच कार्य करण्यास योग्य आहे. बघा, एवढा सुंदर संदेश दिला गेला आहे.

जर तुम्ही कोणतेही काम एखाद्या गैरजबाबदार माणसाला दिले तर त्याने नुकसानच होईल.

जर तुम्ही गैरजबाबदार माणसाला स्वयंपाकाचे काम दिले आणि दुसऱ्या दिवशी न्याहारीसाठी तुम्ही विचारले तर तो, 'न्याहारी अजून तयार नाही', असे तुम्हाला सांगेल.

जर सकाळची न्याहारी दुपारच्या जेवणाच्या वेळेस दिली तर तो माणूस जबाबदार नाही. आणि गैरजबाबदार माणूस कोणतेही काम, संसारिक काम किंवा अध्यात्मीक काम, करण्यास योग्य नाही. म्हणूनच सर्वात प्रथम आपल्याला आपल्या आयुष्यातील जबाबदाऱ्या कशा पार पडायच्या हे माहित असले पाहिजे. आणि ही जबाबदारी कशी पेलावी हे शिकणे म्हणजेच यज्ञोपवित संस्कार होय.

जानवे हे असेच बदलले जात नाहीत. जीवनात जबाबदाऱ्या असतात. म्हणून ते बदलताना -मी जे काही करेन ते जबाबदारीने करेन- या जाणीवेने आणि निश्चयाने बदलतात.