गुरु शिष्य परंपरेचे महत्व

06
2012
Aug
बंगलोर
प्रश्न : ध्यानात गहिरी समाधी लागते तेव्हा श्वास संथ होतो आणि कधी कधी थांबतोसुद्धा. अशावेळी शरीर कसे चालते ?

श्री श्री : जेव्हा स्वास संथ होतो तेव्हा शरीरातील क्रियाशीलताही कमी होते.उष्णतेचा क्षयही कमी होतो. समाधी म्हणजे जवळ जवळ शून्य क्रियाशीलता. पूर्णपणे शून्य क्रियाशीलता असे मी म्हणणार नाही पण जवळ जवळ शून्य. किंचितसे काहीतरी होतच असते. किंचितसा श्वास अगदी संथपणे आंत बाहेर होतच असतो.

प्रश्न: योगवसिष्ठामध्ये राम सांगतात की तिन्ही लोकाचे अस्तित्व मनामुळे आहे. जेव्हा मन नाहीसे होते तेव्हा तिन्ही लोकही नाहीसे होतील.मन म्हणजे त्यांना काय म्हणायचे आहे आणि मनामुळे जगाचे अस्तित्व कसे काय असेल ?

श्री श्री : हे समजावून सांगता येत नाही, हे केवळ अनुभवावे लागते.जोपर्यंत ते तुमच्या अनुभवास येत नाही तो पर्यंत ते फक्त शब्दच लक्षात राहू द्या त्याच्या स्पष्टीकरणाकडे बघू नका.

जर मी तुम्हाला म्हणालो की ‘लाडू गोड असतो’ आणि तुम्ही विचाराल की, ‘गोड म्हणजे कसे?’ तर मला सांगता येणार नाही. मी म्हणेन की ‘लाडू तुमच्या हातात येऊन तुम्ही तो तोंडात टाकेपर्यंत थांबा. मग तुम्हाला कळेल.’ त्याचंप्रमाणे जेव्हा तुम्ही वेदान्तिक सत्य ऐकता तेव्हा जितके जास्त स्पष्टीकरणात जाल तेवढे जास्त गोंधळून जाल. वेदांतात्तील शब्द फक्त ऐकायचे आणि झिरपू द्यायचे असतात. जेव्हा ते झिरपतात तेव्हा तो अनुभव बनतो.

जर मी म्हटले की ,’मी दैवी आहे’, तर तुम्ही म्हणाल की,’ तुम्ही दैवी कसे काय आणि मी दैवी कसा काय ? ‘ तर त्याचे स्पष्टीकरण देणे अशक्य आहे. तुम्ही जेव्हा समाधीमध्ये जाता तेव्हा तुम्हाला अचानक लक्षात येते की, ‘ आह, मी दैवी आहे.’

आत्ताच मी एका इराणी गटाला भेटलो त्यातला एक जण एक गोष्ट सांगत होता. तो एक चित्रपट काढतोय. त्या चित्रपटात तीस जणांचा एक गट देवाच्या शोधात एका गूढ ठिकाणी जातो. तर ते जातात आणि शोध घेतात. मग शेवटी काय होते की त्यांना पाण्यात त्यांचे प्रतिबिंब दिसते आणि त्याच्याकडे पाहून ते म्हणतात, “आता मला कळलं, मीच देव आहे.”

पंचतंत्रातही अशाच गोष्टी आहेत. तुमच्याकडे जे आहे तेच तुम्ही शोधत असता. पण तो शोध आवश्यक आहे कारण, तो तुम्हाला गोल फिरवून आणतो आणि एका क्षणी तुमच्या लक्षात येते की ‘अनहलहक्’ म्हणजे मीच सृष्टीकर्ता आहे . हा एक उर्दू शब्द आहे. ‘अहम् ब्रह्मास्मि’ म्हणजे मीच ब्रह्मन् आहे. वेदांतात हेच सांगितले आहे. अहम् ब्रह्मास्मि’ म्हणजे मीच ब्रह्मन् आहे. तर ‘अनहलहक’ म्हणजे ‘अहम् ब्रह्मास्मि’.

पण दुर्दैवाने जे ‘अनहलहक्’ म्हणाले त्यांना फासावर चढवले गेले. अरबस्थानात त्याचे शिरसंधान केले जाई. पण भारतात सुदैवाने तसे नव्हते. जो कोणी म्हणेल की, ‘अहम् ब्रह्मास्मि’, त्याला चांगल्या आसनावर बसवून हार घालून पूजा व्हायची. असे असायचे. 

ही सर्व सत्ये आहेत जी आतून अनुभवायची असतात. कोणत्याही स्पष्टीकरणाने ते बिघडून जाईल.

प्रश्न : तुम्ही लोकांना मुक्तपणे विचार करायला प्रोत्साहन देता पण मुक्तपणे विचार करणे हे श्रद्धेशी कसे काय जुळते ?

श्री श्री : होय, हीच तर मजा आहे. तुम्हाला सहसा असे वाटते की श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा किंवा तिथे तर्काला काही स्थान नाही. पण इथे तसे नाही.

वेदांतात नेहमीच ‘ विचार’ आणि विवेक या बद्दल बोलले जाते. समाधीबद्दलही असे म्हटले जाते की, ‘विचार-अनुगम समाधी. (समाधीची अशी स्थिती की ज्यात तुमच्या भोवती काही अनुभव,विचार,कल्पना, भावना घुटमळत असतात.) ‘वितर्कानुगम समाधी’, ( अशी समाधी स्थिती, ज्यात सृष्टीबद्दलची वादातीत ,तर्कशुद्ध अशी जाण)

समाधीतपण तर्काला परवानगी आहे. त्यामुळेच ‘सावितर्क समाधी’,( अशी समाधी स्थिती ज्यात चेतनेच्या एका भागाचा, त्याचं चेतनेच्या दुसऱ्या भागाशी संवाद किंवा वाद आहे.) आणि ‘निर्विकल्प समाधी’ आहे. ( अशी समाधी स्थिती,ज्यात कोणताही संवाद किंवा वाद नाही, तर्क नाही. ) तसेच ‘सारविचार समाधी’ ( अशी समाधी ज्यात काही ज्ञानाचा ओघ आहे. अशाप्रकारच्या गहिऱ्या समाधीमध्ये काही क्षीण विचार चालू असतात.) आणि, ‘निर्विचार समाधी’ ( ज्यात ज्यात अजिबात विचार नाहीत.ही एक विचार नसलेली अशी स्थिती आहे ज्यात काही नसण्याचा किंवा केवळ रिक्त असण्याचा अनुभव आहे.)

तर ‘तर्क’ ही काही वाईट गोष्ट किंवा श्रद्धेच्या विरीधी गोष्ट समजली जात नाही. तर्कानेच लोक श्रद्धेकडे वळतात, हो की नाही? जेव्हा तर्काने तुमचे समाधान होते तेव्हा श्रद्धा जास्त पक्की होते. मग तुमच्या श्रद्धेला कोणी धक्का पोचवू शकत नाही.

एखादा म्हणाला की,’ एकदा श्रद्धा असली की मग तर्क करू नका.’ तर मग ती श्रद्धा कमकुवत असते. कमकुवत श्रद्धा ही नेहमी तर्काला घाबरते. पण सत्य तर्काला घाबरत नाही.जेव्हा सत्य असेल तेव्हा कोणत्याही प्रकारे तुम्ही तर्क केला तरी सत्य तेच रहाते. जेव्हा तुमची सत्यावर श्रद्धा असते तेव्हा ते नेहमीच खास असेल.

म्हणूनच सगळा ‘उपदेश’ करून झाल्यावर भगवान श्रीकृष्ण शेवटी म्हणतात, “ मला जे सांगायचे होते ते मी सांगितले. आता तू काय ते ठरव. तुझ्या तर्कबुद्धीला पटले तर स्वीकार कर.” श्रीकृष्ण म्हणतात,“यथेस्चसी तथा कुरु.” ( तुला जसे वाटेल तसे कर.)

हे खूप महत्वाचे आहे. असे बघा कि, इकडे पूर्वेकडे तर्क आणि श्रद्धा यांच्यात संघर्ष नाहिये.विशेषत: जेव्हा ज्ञान हे अनुभवावर आधारित असते मनोधारणेवर आधारित नसते तेव्हा तुम्हाला तर्काने श्रद्धेला धक्का पोचण्याची भीती बाळगण्याचे कारण नसते.

चुकीचा तर्क मात्र करायचा नाही. तर्क चांगला आहे मात्र कुतार्काने तुम्ही कशाचा धिक्कार करू लागलात तर ते मात्र श्रद्धेच्या विरोधी असेल. तर प्रामाणिक साधक कुतर्क लढवणार नाही. कुतर्काचे उदाहरण म्हणजे – दरवाजा जर अर्धा बंद असेल तर तुम्ही म्हणू शकता की दरवाजा अर्धा उघडा आहे. पण दरवाजा पूर्ण बंद आहे म्हणजे तो पूर्ण उघडा आहे असे नाही. दरवाजा पूर्ण उघडा असताना तो पूर्ण बंद आहे असे म्हणणे म्हणजे कुतर्क.

विज्ञानात प्रथम तर्क येतो आणि मग श्रद्धा. बरोबर ? तुम्ही तर्काने सिद्ध करता आणि मग तर्काने जे पटते त्यावर विश्वास ठेऊ लागता

प्रश्न : गुरुदेव जर कुणी चारित्र्य आणि कसोटीवर आरोप करत असेल तर काय करावे ?

श्री श्री : कन्नडमध्ये एक सुंदर श्लोक आहे, त्यात म्हटले आहे की,

त्या माणसाला तुम्ही काय म्हणाल ज्याला आवाजाची भीती वाटते, त्याने भर बाजारात घर बांधले आहे ?

त्या माणसाला तुम्ही काय म्हणाल ज्याने समुद्र किनारी घर बांधले आहे, त्याला लाटांची भीती वाटते ?

त्या माणसाला तुम्ही काय म्हणाल ज्याने त्याने जंगलात घर बांधले आहे, त्याला प्राण्यांची भीती वाटते ?

त्या माणसाला तुम्ही काय म्हणाल जो समाजात रहातो आणि त्याला दोषारोप, आरोप आणि स्तुती यांची भीती वाटते ?

लोक आरोप करतात, नावे ठेवतात, तुम्ही काय करू शकता ? त्यांना तसे करुदेत आणि तुम्ही दुर्लक्ष करा. जरी तुम्ही सगळं चांगलच केल आहे आणि चांगल्याशिवाय काहीच केले नाही तरी लोक तुम्हाला नावे ठेवतात. ते तुम्हाला चुकीचा किंवा सरळमार्गी नसलेला ठरवतील.तुम्ही काय करू शकता ? काही नाही. जसे मी म्हटले, तुमची काहीही चूक नसताना लोक तुमचे शत्रू होतात. इथे किती लोकांना असा अनुभव आला आहे ? ( बरेच लोक हात वर करतात. ) तुम्ही त्यांना काहीही त्रास दिलेला नाही पण ते तुमचे शत्रू झालेत. तसेच काही लोकांवर तुम्ही काही फारसे उपकार केले नाहीत पण तरीही ते तुमचे मित्र झालेत. हो की नाही ?

तर मित्र होणे किंवा शत्रू होणे हे कर्म नावाच्या एका वेगळ्याच कायद्यामुळे होत असते. कर्मच तसे असेल तर काही घटनांबद्दल तुम्ही काहीच स्पष्टीकरण देऊ शकत नाही. ते तसे घडते इतकेच. त्यामुळे तुम्ही न केलेल्या गोष्टींसाठी लोकांनी तुमच्यावर आरोप केले तरी काळजी करू नका. अस्वस्थ होऊ नका. तुम्ही अस्वस्थ होऊ नका असे म्हणणे सोपे आहे पण तुम्ही अस्वस्थ होतच.पण त्यावेळी तुम्हाला हे ज्ञान उपयोगी पडेल की, ‘ कोणते तरी विचित्र कर्म आहे. असू दे. तर काय झाले, आपण काय करू शकतो ? जगाचा तसा निसर्ग नियम आहे.’ अशा प्रकारे तुम्ही स्वत:ला विरागी करायला हवे. जो विरागी असेल तो नेहमीच आनंदी रहातो.

 ||कस्य सुखम् ना करोति विराग:|| 

मनाच्या वैराग्य स्थितीशिवाय दुसरा मोठा आनंद नाही.

प्रश्न : कधी कधी मला आश्चर्य वाटते , माझ्या इतक्या न संपणाऱ्या इच्छा असतात आणि तुम्ही त्या सर्व पूर्ण करत राहता. मला याचे हसायला येते. इच्छापासून मुक्ती कशी मिळवावी गुरुदेव ?

श्री श्री : तुमच्या इच्छा पूर्ण होताहेत याची तुम्हाला जाणीव आहे हे पुरेसे आहे. दुसऱ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यात स्वत:ला गुंतवून घ्या तुमच्या स्वत:च्या नव्हे.

बघा गुरु शिष्य परंपरेचे महत्व काय आहे ? शिष्याला याची जाणीव होणे की इच्छा न संपणाऱ्या आहेत. जसे, एकानंतर एक येत रहाण्याची समुद्राच्या लाटांची इच्छा असते. त्यामुळे माझ्या इच्छा मी दूर ठेऊन गुरुच्या इच्छेप्रमाणे वागत रहावे.

जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा तुमचे मन आतून रिक्त आणि पोकळ होते आणि तुम्हाला हलकेपणा जाणवतो. मग जीवन आनंद आणि दु:खाच्या पलीकडे जाते. आणि सर्व हाव आणि तिरस्कार आपोआप गळून पडतात. हाव आणि तिरस्कार घालवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. म्हणूनच म्हटले आहे,

 ||‘ना गुर्रू अधिकम्, ना गुर्रू अधिकम्, ना गुर्रू अधिकम्’|| 

( गुरूपेक्षा श्रेष्ठ काही नाही, गुरूपेक्षा श्रेष्ठ काही नाही, गुरूपेक्षा श्रेष्ठ काही नाही कारण गुरू हाच सर्व श्रेष्ठ आहे)

त्यामुळे गुरूवर सर्व काही सोडून द्या आणि गुरूला समर्पण करून टाका.

इच्छा करून समाधान मिळत नाही. कारण एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी निर्माण होते. आणि ती पूर्ण झाली की आणखी एक निर्माण होते. आणि मन इच्छाच्या मध्ये भटकत रहाते. ही ना ती इच्छा तुम्हाला रात्रंदिवस त्रास देत राहील. तुम्हाला माहित आहे कां , या जगात तुम्हाला त्रास देते असे या जगात जर काही असेल तर यादीत सर्वात वरचा क्रम कुणाचा असेल तर तो तुमच्या मनाचा ! मी म्हणतोय सर्वात वरचा क्रम कारण तुम्हाला हे दिसत नाहिये. तुम्हाला वाटते की कुणीतरी दुसरे तुम्हाला त्रास देत आहे. तुम्हाला वाटते की तुमची सासू तुम्हाला त्रास देत आहे किंवा तुमची सून त्रास देत आहे किंवा तुमचा नवरा किंवा बायको तुम्हाला त्रास देत आहे. हे सगळे दुसऱ्या क्रमांकावर ठेवा. तुमचे स्वत:चे मन तुम्हाला त्रास देत आहे. दुसरा कुणी शत्रू नाहिये. एकदा हे तुमच्या लक्षात आले की तुम्हाला समजेल की दुसरे कुणी नाही तर सर्व त्रास तुमच्या मनामुळे आहेत.

गुरुशिष्य परंपरेचे महत्व हेच की इच्छा न संपणाऱ्या आहेत याची शिष्याला जाणीव होणे. त्यामुळेच मी माझ्या इच्छा बाजूला ठेऊन माझ्या गुरुच्या इच्छेप्रमाणे करावे. तुम्ही जेव्हा असे कराल तेव्हा मन रिक्त आणि पोकळ बनते. मग जीवन आनंद आणि दु:खाच्या पलीकडे जाते. आणि मग सर्व हाव आणि तिरस्कार नाहीसे होतात.