जेंव्हा आपण निसर्ग नियमाच्या विरुद्ध जातो तेंव्हा निसर्ग कोप भोगायला लागतो.
1 फेब्रुवारी २०१२
प्रश्न: सुर्याला अर्घ्यं
देण्याला काय महत्व आहे?
श्री श्री: पाणी हे प्रेमाचे
प्रतिक आहे. संस्कृतमध्ये ते प्रेमाला समान अर्थी आहे. “आप” म्हणजे “पाणी”, तसेच
“आप’ म्हणजे प्रेम. म्हणूनच एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणता ? “आप्त”
म्हणजे खूप प्रिय. आप आणि आप्त हे एकसारखे आहे. तर पाणी देण्याला महत्व नाहीये तर त्या
क्रियेतील सुर्याशी जोडला जाणारा संबंध हा महत्वाचा आहे.
सुर्याला अर्घ्यं देतांना लोक
काय करतात, हातांची ओंजळ करून त्यात पाणी भरून घेतात, आणि सूर्याकडे बघत ते पाणी
हळू हळू हातामधून सोडून देतात. या क्रियेमध्ये सूर्याकडे बघत, त्याचे अवलोकन करीत
पाणी सोडले जाते. अशावेळी, त्याला लागणारा वेळ माहित पाहिजे. साधारणपणे ओंजळीतील
सर्व पाणी गळून जायला दोन किंवा तीन मिनिटे लागतात. ते पाणी पूर्ण गळून जाई पर्यंत
तुम्ही सूर्याचे अवलोकन केल्याने सर्व शरीरात उर्जा खेळायला लागते. हे त्यातले
मुख्य तंत्र आहे, सुर्याला नुसते पाणी देऊन काही होत नाही.
प्रश्न: गुरुजी, तुम्ही एकदा
असे म्हणाला होतात कि हे विश्व, प्रकृती आणि परमात्मा यांच्या संयोगातून निर्माण
झाले आहे. परमात्मा जर पूर्ण आनंद आहे तर हा विश्व निर्मितीचा संकल्प/ विचार
त्यांना कसा सुचला असेल?
श्री श्री: होय, असे उपनिषदात
सांगितले आहे पूर्वी फक्त परमात्मा एकटाच होता आणि मग त्यांना खूप एकटे वाटू
लागले, म्हणून त्यांनी एकाचे अनेक व्हायचे ठरवून ते अनेक झाले. हा विचार त्यांना
आपसूकच सुचला “”एकोहम् बहुसाम्य”.
संकल्प म्हणजे विचलीतपणा नव्हे.
जेंव्हा एखादा साधक लहानाकडून मोठ्या मनाकडे झेप घेत असतो, तेंव्हा केलेला
संकल्प अडथळा होऊ शकतो. परंतु मोठे मन
जेंव्हा असा विचार करू लागते तेंव्हा ती एक पुढची पायरी पार करणे असते. म्हणून
तुम्हाला जर असे वाटत असेल कि जेंव्हा परमात्म्याच्या मनात जेंव्हा असा संकल्प
आल्यानंतर त्यांनी निर्विकार राहायला पाहिजे तर ते तसे नसते. तर संकल्प,
निर्विकल्प, तसेच विकल्प म्हणजे प्रत्यक्ष परमात्माच आहे. ज्याप्रमाणे समुद्रात
आपोआप लाटा उठतात, त्याप्रमाणे परमात्याच्या मनात एकाचे अनेक व्हायचा विचार येताच
ते अनेक झाले. आणि मग नानाप्रकारचा निसर्ग, अनेकप्रकाराचे लोक, वेगवेगळ्या
बुद्धिमत्ता सर्वकाही तयार झाले.
परवाच्या दिवशी मी नेशनल जोग्राफिक
वर पृथ्वीच्या उत्पत्तीवर एक वृत्त-चित्र बघत होतो. त्यात त्यांनी असे सांगितले कि
सुमारे ४०० अब्ज वर्षांपूर्वी फक्त वायू होता, तो फिरायला लागल्यावर त्यातून अग्नी
निर्माण झाला. त्यातून पुढे पाणी तयार झाले आणि मग पृथ्वी तयार झाली.
मला अचानक आठवले कि हे सर्व तर
वेदांमध्ये सांगितले आहे, ते नवीन काहीच सांगत नाहीयेत.
आपल्या वेदातील श्लोक हेच
सांगतात कि अवकाशात प्रथम फक्त हवा होती, हवेतून अग्नी निर्माण झाला, अग्नीतून
पाणी तयार झाले, आणि मग पाण्यातून पृथ्वी तयार झाली. अग्नीला पाणी देणे म्हणजे आपण
परत आतमध्ये वळण्यासारखे आहे. पाण्यातून
अग्निकडे, अग्निकडून हवेकडे, आणि मग सुर्याला अर्घ्यं देऊन प्राणायाम करतो, म्हणजे
परत वायू तत्वाकडे येतो आणि ध्यान करतो.
अशा या सगळ्या गोष्टीं
तपासल्यावर आपल्याला प्रत्येकवेळी काहीतरी नवीन गवसते.
प्रश्न: गुरुजी, असे म्हणतात कि
आपल्या मृत पालकांचे फोटो आपल्या पूजेतील देव देवतांबरोबर ठेऊ नयेत. काहीजण असे पण
म्हणतात कि आपल्या मृत पालकांचे फोटो घरात भिंतींवर लावू नयेत. हे खरे आहे का?
श्री श्री: नाही, असे करण्यात
काहीच हरकत नाहीये. खरी पद्धत अशी आहे कि तुम्ही तुमच्या मृत पालकांचे फोटो
देवाबरोबर ठेऊ शकता. जर तो एखाद्या संन्याशाचा फोटो असेल आणि तो जर जिवंत असेल तरी
त्याचा फोटो पण तुम्ही देवाजवळ ठेऊ शकता. पण एखाद्या गृहस्थाश्रम व्यतीत करणाऱ्या म्हणजेच
लग्न झालेल्या, कुटुंबकबिला असलेल्या जिवंत माणसाचा फोटो देवाजवळ लावणे बरोबर
नाही.
प्रश्न: गुरुजी, यातना
भोगण्याची कारणे काय असू शकतात?
श्री श्री: असे बघा कि मी जर
तुम्हाला म्हणालो तुम्ही आज पाच मसाला डोसे खा तर तुमचे काय होईल? समजा कि
तुम्हाला जर कोणी जबरदस्तीने पाच मसाला डोसे किंवा वीस पुऱ्या खायला घातल्या तर
तुमचे काय होईल?
सर्वप्रथम ते तुम्हाला शारीरिक
त्रास लागेल. मग आज रात्री तुम्ही झोपू शकणार नाही, बरोबर? मग तुमचे डोके दुखायला
लागेल, पोट दुखायला लागेल आणि मग सर्व तऱ्हेच्या वेदना सुरु होतील.
पहिले म्हणजे जेंव्हा आपण निसर्ग
नियमांच्या विरुद्ध जातो, तेंव्हा मग त्याचे परिणाम भोगायला लागतात. दुसरे म्हणजे
अज्ञान, जेंव्हा तुम्हाला माहित नसते कि तुम्ही काय खाताय ,तुम्ही काहीतरी चुकीचे
खाता आणि मग तुम्हाला त्रास होतो. तिसरे
म्हणजे तुम्ही पूर्वी कधीतरी, कदाचित मागच्या जन्मी जर कुठल्या नियमाविरुद्ध वागला
असाल त्यामुळे पण काही कर्म निर्माण होऊ शकते.
तर हे अज्ञान दूर कसे करायचे? तर
ज्ञान आणि समज वाढवून, आत्ता जसे प्रश्न विचारात आहात तसे प्रश्न विचारून.
प्रश्न: एखाद्याला खऱ्या
अर्थाने माफ कसे करावे?
श्री श्री: खऱ्या अर्थाने? खोट्या
अर्थाने माफ करणे असू शकते काय?
मला खोट्या अर्थाने माफ करणे
म्हणजे काय ते माहित नाही. मला फक्त खऱ्या अर्थाने माफ करणेच माहित आहे. माफ करा
म्हणजे माफ करा, एव्हढेच. झाले गेले गंगेला मिळाले, लोकांनी चुका केल्या आहेत,
त्या माफ केल्यावर सगळे संपले आहे, आता पुढे चला.
तुम्हाला माहित आहे का कि एखादी
गोष्ट परत का येते कारण तुम्ही त्या आनंदाविषयी आसक्त होता म्हणून. ती काही
दुसऱ्याची चूक नव्हे. समजा तुम्हाला काही आनंद मिळाला, कि कोणीतरी तुम्हाला काही
सुख दिले आणि मग त्यांनी तुम्हाला फसविले, किंवा ती त्यांची चूक होती, पण मग जर
तसे पुन्हा घडले तर तुम्ही त्या आनंदाची
अपेक्षा करीत होता म्हणून. तुम्ही जेंव्हा त्याकडे एक तुमचा भ्रम म्हणून बघाल तर
तुम्ही जास्ती केंद्रित व्हाल.
प्रश्न: २०१२ मध्ये विशेष काय?
श्री श्री: तुम्हाला माहित आहे कि
प्रत्येक दिवस हा विशेष आहे, प्रत्येक वर्ष हे विशेष आहे.
हिंदू पंचांगाप्रमाणे पुढील वर्ष
हे नंद म्हणजेच आनंद आहे. हे तर आनंदाचे वर्ष आहे. २३ मार्चला संपणाऱ्या वर्षाचे
नाव होते “ खरा”, खरा म्हणजे निश्चित, नक्की. त्यापूर्वीचे वर्ष अनिश्चिततेचे होते
आणि हे वर्ष निश्चीततेचे, खात्रीचे आहे. पुढील वर्ष हे आनंदाचे आहे.
प्रश्न: आत्मा कधी आनंद आणि
दुःख याचा अनुभव घेतो का हे सर्व मनाचे अनुभव आहेत?
श्री श्री: हे अनुभव फक्त मनाचेच
आहेत. मन हे सर्व अनुभव घेत असते. आत्म्याचे अनुभव पण मनाच्या पातळीवरच घेतले
जातात.जेंव्हा मन शांत असते, तेंव्हाच आत्मा अनुभव घेऊ शकतो.
प्रश्न: मन आणि आत्मा यांच्या
सीमारेखा काय असतात? मन कोठे संपून आत्मा कोठे सुरु होतो?
श्री श्री: हे समुद्र आणि त्याच्या
लाटांसारखे असते. समुद्रामध्ये जशा लाटा असतात तसेच आत्म्यामध्ये मन असते. म्हणजे
मनाला आत्म्याशिवाय वेगळे अस्तित्व नाही.ती तर एक समुद्रावरची लाट आहे. ती थोडीशी
तयार होते आणि परत शांत होते, परत तयार होते आणि परत शांत होते.
प्रश्न: गुरुजी, काही लोकांना
आयुष्यभर यातना का सहन करायला लागतात? काही लोक झोपडपट्टीत जन्माला येऊन आयुष्यभर
यातना सहन करीत राहतात, तर काही लोक चांगल्या घरात जन्माला येऊन आयुष्यभर सुखी
असतात. मला हे समजून घ्यायचे आहे. मी आणि माझ्यासारखे काही लोक हे आयुष्यभर यातनाच
भोगत असतात.
श्री श्री: तुम्ही खरेच यातना
भोगीत आहात काय? मला सांगा कि हे तुमचे दुखः आहे कि दुसऱ्या कोणाचे दुखः आहे?
प्रश्नकर्ता: मी पण यातना भोगत आहे.
श्री श्री: तुम्ही पण? पण तुम्ही
तर स्मित हास्य करताय! तुमच्या चेहऱ्याकडे बघून असे वाटत नाहीये कि तुम्ही दुखी
आहात. याचीच तर गरज आहे. तुम्ही जेंव्हा साधना करता तेंव्हा तुमच्या चेहऱ्यावरती
हास्य असते नाही का? दुःखामध्ये पण जेंव्हा तुमच्या चेहऱ्यावर स्मित-हास्य असते,
त्यालाच जीवन म्हणतात.
प्रत्येक अडचण हि जाण्यासाठीच
असते. ती येताच परत जायची तयारी करीत असते. कोणताही प्रश्न हा कायमचा नसतो. ते
नेहमी येत जात असतात.
प्रश्न: गुरुजी, पुनर्जन्म आहे
काय?
श्री श्री: निश्चितच!
प्रश्न: गुरुजी, तुम्ही
साधकांच्या दोन तऱ्हा सांगितल्यात, एक मांजरासारखी आणि दुसरी माकडासारखी. आजच्या
साधाकांविषयी बोलतांना तुम्ही म्हणालात कि कधी ते या बाजूला असतात तर कधी त्या
बाजूला असतात.
श्री श्री: होय ते खरे आहे, आपण
त्यावर उद्या सत्संगाच्या वेळी चर्चा करूयात.
प्रश्न: गुरुजी, मी तुमचा आवडता
शिष्य होण्यासाठी काय करावे लागेल?
श्री श्री: तुम्ही पहिल्यापासून माझे
आवडते आहात, सध्या जे करताय ते चालू ठेवा. सेवा , साधना सुरु ठेवा, सत्संगाला येत
रहा, शिक्षक व्हा. दुसऱ्यांचे अश्रू पुसा, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करा.
माझे शिष्य आहात म्हणजे माझे आवडते आहात, त्यात आवडता शिष्य , नावडता शिष्य असे
काही नसते, आले लक्षात?

© The Art of Living Foundation