“ज्या कशाने तुमच्या मनाला उभारी मिळत असेल तेच अध्यात्म”
३ फेब्रुवारी २०१२

आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत श्री श्री रवी शंकर आपल्या उद्घाटनाच्या भाषणात म्हणाले.
अरे वा ! व्यासपीठावर आणि प्रेक्षागृहात अनेक मान्यवर स्त्रियांच्या मध्ये बसून बोलणे खूपच कठीण आहे. असे म्हणतात की, जेव्हा महिला सत्तेवर असतील तेव्हा गप्प बसणे शहाणपणाचे असते. व्यापार, तंत्रज्ञान, सत्य आणि परंपरा यांचे पुन्हा पुन्हा पुनरुज्जीवन करणे महत्वाचे असते. धंद्यातल्या  चुकीच्या गोष्टींकडे जर वेळेवरच लक्ष दिले नाही, त्यांचा पुनर्विचार केला नाही आणि आपण जर धंद्यातल्या जुन्याच धोरणानुसार चालत राहिलो तर धंद्यात कधीच प्रगती होणार नाही. इथे हजर असलेल्या अनेक व्यावसायिक महिलांना मी काय म्हणतोय ते समजेल. तंत्रज्ञानाचेही तसेच आहे.
आजच्या मोबाईल फोनच्या युगात तुम्ही त्या जुन्या वायरला जोडलेल्या फोनमध्येच अडकून राहू शकत नाही. तीस चाळीस वर्षांपूर्वी फोन करणे किती कठीण होते हे नवीन पिढीला माहीतच नाहिये. आपल्याला फोन बुक करून वाट बघत बसायला लागायचं की ऑपरेटरचा फोन कधी येतोय. इतकं की, वाट बघायला लागणाऱ्या वेळात माणूस तिथे जाऊन परतही येईल ! ते गाव पन्नास किलोमीटर दूर असेल पण संपर्क साधायला आम्हाला दोन दोन तास लागायचे.
पण आज तंत्रज्ञान सुधारले आहे. आता आपल्याकडे मोबाईल फोन आहेत. अगदी बोटाच्या टोकावर आपण जगात कुठेही संपर्क करू शकतो. आताच एका वक्त्याने म्हटल्याप्रमाणे आपण तंत्रज्ञानात प्रगती करतोय कारण आपण ते रोज अद्ययावत करत आहोत. 
त्याच प्रमाणे आपल्याबद्दलचे आणि आपल्या आयुष्याबद्दलंचे सत्य अद्ययावत करणे जरुरीचे असते. आपण याकडे लक्ष देऊन स्वत:ला पुन्हा पुन्हा विचारण्याची गरज आहे की,” मला काय पाहिजे आहे ? मी जे करतोय ते बरोबर आहे कां ? मी खुश आहे कां ?”
आध्यात्म म्हणजे उगीच बसून केलेली वायफळ बडबड नाहिये तर ते आपल्या स्वत:चा पुनर्विचार  करून स्वत:बद्दलचे सत्य जाणणे आहे.
आपण योग्य आहोत कां ? समाज योग्य आहे कां ? आपण जे नियम, कायदे केले आहेत ते योग्य आहेत कां ? लिंग समानता आहे कां ? आपल्या मुलाना योग्य शिक्षण, जीवनमूल्ये, आणि योग्य जोपासना मिळत आहेत कां ? समाज कुठे चाललाय, मी कुठे चाललोय ?
या प्रश्नांवर,या सत्यावर विचारविनिमय करणे , पुन्हा पुन्हा विचार करणे यालाच मी आध्यात्म म्हणतो.
ज्या कशाने तुमच्या मनाला उभारी मिळत असेल तेच अध्यात्म. संगीत, नृत्य, चर्चा, सेवा प्रकल्प, या सर्व कृती करण्याने मनाला उभारी मिळते. आणि हे गरजेचे आहे. आपण सत्याचा आणि आपल्या परंपरांचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे. त्यांना अद्ययावत करणे गरजेचे आहे.त्याच्यात काही अर्थ असेल तर ते ठेवा जर त्यात काही अर्थ नसेल जर ते अपायकारक असेल तर आपण ते टाकून दिले पाहिजे.जे अपायकारक गोष्ट धरून ठेवण्यात काही अर्थ नाही. यात महिलांची भूमिका महत्वाची आहे कारण कारण परंपरा टिकवणार्‍या त्याचं असतात. कधी कधी काही परंपरा निर्माण होतात आणि आपण आंधळेपणाने त्यावर शंका न घेता , “ मी हे कां करतोय ?” असा प्रश्नही न विचारता आपण त्या पाळतो. आणि यांच ठिकाणी महिला महत्वाची भूमिका बजावू शकतात.
एक गोष्ट आहे की, एका वयस्क माणसाची दाताची कवळी होती. तर तो जेवण झाल्यावर तो बाथरूममध्ये जायचा, त्याची कवळी धुवायचा, एका डब्यात ठेवायचा आणि तो डबा एका शेल्फमध्ये ठेवायचा. तर त्याने ही परंपरा सुरु केली. त्याची मुले बघायची की ते बाथरूम मध्ये जातात, काहीतरी डब्यात ठेवतात आणि तो डबा शेल्फ मध्ये ठेवतात. मग तो वारल्या नंतरही मुलांनी तेच चालू ठेवले. त्यांना कवळी लागत नव्हती पण त्यांनी तसेच करणे सुरु ठेवले की बाथरूम मध्ये जायचे, डबा धुवायचा आणि तो शेल्फ मध्ये ठेवायचा. कां ? तर, ते असे करायचे कारण त्यांचे आजोबा तसे करायचे.
ज्या गोष्टींचा आपल्याला अर्थ लागत नाही त्या आपण अशाच नाही करू शकत. जेव्हा परंपरेला प्रश्न विचारणे बंद होते तेव्हा अंधश्रद्धा सुरु होते. आपण आपल्या परंपरेला प्रश विचारून ते किती उपयोगाचे आहे ते बघितले पाहिजे. जर ते उपयोगाचे असेल तर आपण ते नक्की चालू ठेवायला हवे अन्यथा सोडून द्यावे.
तर, चार गोष्टी आपण अद्ययावत करत रहायला हव्या ; सत्य, तंत्रज्ञान, परंपरा, आणि व्यापार धंदा. अद्ययावत राहणे म्हणजे  फैशन. आणि स्त्रिया फैशन करतात. मला नाही वाटत, जगात अशी कुणी स्त्री असेल जी फैशनेबल नसेल किंवा जिला फैशन आवडत नसेल.स्त्री असण्याचा एक गुण म्हणजे त्यांना फैशन आवडते. फैशन म्हणजे अद्ययावत करत रहाणे. ती कधी जुनी असू शकत नाही. ‘ जुनी फैशन ‘ असे म्हणणे हा विरोधभास आहे. जुने तरी असते किंवा फैशन तरी असते.
तर ह्या चार गोष्टी अद्ययावत करत रहायला हव्या. मला आनंद वाटतोय की तुम्ही ‘महिला आणि तंत्रज्ञान’ हा चांगला विषय निवडला आहे. तंत्राद्न्यानामुळे सुख मिळते पण त्यात धोकाही आहे. याआधी झालेल्या इतरांच्या भाषणात म्हटल्याप्रमाणे , तंत्रज्ञान हे सुखसोयी पुरवण्यासाठी आहे. पण बरेचदा त्यातून काही मोठे प्रश्न निर्माण होतात. लोक एकमेकांपासून तुटक होतात, मुले म्हणजे यंत्र बनतात आणि धोकादायक असा किरणोत्सर्ग ही असतो.
कालच या राज्याचे मुख्य मंत्री मला भेटायला आले होते .ते सांगत होते की त्यांचं इतकं डोकं दुखतंय की डॉक्टरही काही करू शकत नाहीयेत. ते म्हणतात की हे मोबाईल फोनमुळे होत आहे .मोबाईलच्या किरणोत्सर्गाने त्यांच्या मेंदूतील न्युरॉनसना धक्का पोहोचला आहे आणि कुठल्याही डॉक्टर्सना नेमके कारण सापडत नाहिये.मला माहिती आणि तंत्रज्ञान IT (Information Technology)  या क्षेत्रात काम करणारे बरेच लोक माहित आहेत की ज्यांना हा त्रास आहे. ते संगणकासमोर बसतात त्यांना काहीतरी होते. किरणोत्सर्गाचा मेंदूवर, न्युरॉनसवर आणि मज्जासंस्थेवर परिणाम होतो. उशिरापर्यंत काम, झोपेचा अभाव,व्यायामाचा योग्य आहाराचा आणि ध्यानाचा अभाव या सर्वांमुळे आरोग्य विषयक अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि ही तंत्रज्ञानाचि भेट आहे असे म्हणता येईल.
आज जिथे टेलिफोन नाही, टीव्ही नाही, जिथे टॉवरस् नाहीत आणि किरणोत्सर्ग नाही अशा ठिकाणी रहायला लोकांना बरे वाटते. आपण अशा युगात जातोय जिथे आपल्याला वीजही नको आहे.
मला काही आरोग्य केंद्रे माहीत आहेत जिथे त्याना ही उच्च दाबाची उर्जा वापरायची नाहिये. ते काय वापरतात तर फक्त नैसर्गिक उर्जा, सौर उर्जा.मग इथेसुद्धा आपल्याला अद्ययावत होण्याची गरज आहे. आपल्याला तंत्रज्ञानाशिवाय तरणोपाय नाही. आपण तंत्रज्ञान वर्ज करू शकत नाही. पण त्याचं बरोबर आपल्याला मानवी मूल्येही जोपासायला हवी. 
आपल्याला आपल्या कुटुंबाचे आरोग्य, आपल्या स्वत:च्या शरीराचे आरोग्य, आपल्या मुलांचे आरोग्य, त्यांचि वागणूक, आणि एकूणच आपल्या समाजाचे आरोग्य हे सर्व लक्षात घ्यायला हवे. 
आणखी एका मुद्यावर मला आज बोलायचे आहे आणि तो म्हणजे भ्रष्टाचार. आज देशात काय झाले आहे ते तुम्ही बघताय. काळ सुप्रीम कोर्टाने काय सांगितले ते तुम्ही ऐकले असेल. जिथे आपलेपणा संपतो तिथे भ्रष्टाचार सुरु होतो. या खंडात सगळीकडे श्रीयांनी राज्य केले आहे, मग तो बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका असो की भारत असो. पण आपल्याला अजून बरेच काही करायचे आहे. हा खंड भ्रष्टाचार मुक्त झालेला बघायचा आहे. मी फक्त या खंडाच्या भ्रष्टाचार मुक्तते बद्दल बोलतो आहे याचा अर्थ असा नाही की इतर खंडात भ्रष्टाचार नाहिये. युरोपच्या पार्लमेंट मधील सदस्याने मला सांगितले की फक्त युरोप मध्ये ६०० अब्ज डॉलर इतका भ्रष्टाचार होत आहे. तर जिथे आपलेपणा संपतो तिथे भ्रष्टाचार सुरु होतो. जिथे आपलेपणा संपतो तिथे हिंसाचार सुरु होतो.
महिला प्रतिनिधी म्हणून तुम्ही सर्वांनी याचा विचार करा आणि आवर तोडगा निघेल असे प्रकल्प तयार करा जेणेकरून आपल्या देशावरील आणि या जगावरील संकट दूर होईल. मला खत्री आहे की तुम्ही जे हाती घ्याल आणि ते यशस्वी करून दाखवाल. मला पूर्ण खात्री आहे की महिला जे हाती घेतील त्यात त्या यशस्वी होतीलच मग ते लहानसे असो की मोठे असो.
मी तुम्हाला हे सांगतो की ,देव सगळे करतो, पण तुम्ही ते केले आहे असे दर्शवतो.  त्यातून तो हे जास्तच स्पष्ट करतो की तो हे करतो आहे आणि ते तो तुमच्या मार्फत करतो आहे.ती किंवा तो करतोय आणि तुमच्या मार्फत करतोय. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आणि तुमचा वेळ मजेत जाऊ दे.   



The Art of living
© The Art of Living Foundation