मधुर असत्य आणि कटू सत्य कधीही बोलू नका !!
२३ डिसेंबर २०११

मी अनेक देश फिरलो, हजारो लोकांना भेटलो; पण मला त्यामध्ये कोणीच अनोळखी वाटला नाही. सर्वजण माझे आहेत. जेव्हा आपण एखाद्याला अनोळखी समजत नाही, तेव्हा तोही आपल्याला अनोळखी नजरेने पाहत नाही.
आपल्याबद्दल एखाद्याला आपलेपणा केंव्हा वाटेल? जेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल आपलेपणा वाटेल तेंव्हाच ! इथे कोणीही अनोळखी नाही; सर्वजण आपलेच आहेत, हा पहिला मंत्र!
दुसरं म्हणजे, जे आपल्या अंतरंगात असते तेच बाहेर असते. म्हणूनच खुल्या मनाने, तसेच साधेपणाने जगा. आपल्याला जे हवे आहे, ते आपल्याला मिळणारच आहे या आत्मविश्वासाने जगणे हाच साधेपणा आहे. मी आहे हा असा आहे, मग ते बरोबर असो किंवा चुकीचे असो. आपण असे जर सहजपणे जगलो, तर आपल्याला कसलेच भय राहणार नाही. ना कुठल्या शंका ना कुठले अडथळे ! हाच ‘आर्ट ऑफ लीवींग‘ चा महत्वाचा मंत्र आहे.
साधेपणाने आणि सहजपणे जगणे याचा अर्थ असा नाही, की तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन तुमच्या बॉसलाच म्हणाल की, तू मूर्ख आहेस. असं करू नका. आपल्या बुद्धीचा वापर करा. नाहीतर तुम्ही म्हणाल, गुरुजी म्हणतात सहजपणे आणि प्रामाणिकपणे जगा म्हणून तुम्ही एखाद्याच्या शोकसभेत जाऊन म्हणाल, मला याच्याबद्दल काहीच वाटत नाही. तुम्ही कशासाठी रडताय? चला आपण आनंद साजरा करुया. असं करू नका.
मी असं ऐकलय की, अडवान्स कोर्स  केल्यानंतर एक सदगृहस्थ घरी गेले आणि आपल्या बायकोला उचलून घेऊन मजेत घरभर फिरु लागले. बायकोने विचारलं, ‘आज काय झालंय तरी काय? आज काय गुरुजींनी सांगितलं का बायकोवर प्रेम करा म्हणून!’ तेव्हा ते सदगृहस्थ म्हणाले, नाही नाही. गुरुजींनी सांगितलंय आपल्या सगळ्या समस्या आणि सर्व दडपण आनंदाने स्वीकारा!

प्रश्न: गुरुजी, नवीन वर्षासाठी आपला काय संदेश आहे? नवीन वर्षात साधकाने कसे रहावे?
श्री श्री: एक उत्कृष्ट जग आणि एक उत्कृष्ट समाजनिर्मिती यावर आपली सेवा केंद्रित असावी. व्यक्तिगत जीवनात जे आहे ते सर्व चांगलेच आहे आणि यापुढेही चांगलेच घडणार आहे यावर दृढविश्वास आणि श्रद्धा ठेवावा.
तुम्ही असं ऐकलं असेल की, मायन कॅलेन्डरनुसार हे शेवटचे वर्ष असणार आहे आणि महाप्रलयाचा दिवस लवकरच येत आहे. आता जगाचा अंत होणार आहे असे सांगणारे बरेच चित्रपटदेखील बनले आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, असं काहीही घडणार नाही. जगरहाटी सुरूच राहील. वैदिक कॅलेन्डरनुसार मार्च २०१२ पासून या वर्षाला नंद म्हटले आहे. नंद म्हणजे आनंद. हे वर्ष आनंदाचे आहे. प्रथम आनंद आणि त्यापाठोपाठ विजय! तुम्ही आनंदी आणि विजयी होणार आहात. म्हणून चिंता करू नका. समाजासाठी काही चांगले काम करण्याचा आणि ज्ञानाचा प्रसार करण्याचा संकल्प करा आणि मग पहा, येत्या वर्षाच्या अखेरपर्यंत खूप लोक अध्यात्माकडे वळलेले असतील. आतंकवाद आणि दहशदवाद यांची ताकद कमी झालेली असेल.हे असेच होईल आणि तुम्ही त्याचा एक भाग असाल.

प्रश्न: गुरुजी, आपण म्हणता अध्यात्म हे ‘चैतन्याचे तंत्रज्ञान’ आहे. ही संकल्पना खरोखरच अदभुत आहे. याबद्दल जरा सविस्तरपणे सांगा ना.
श्री श्री: तंत्रज्ञान म्हणजे निसर्गाच्या नियमांवर आधारित संरचना किंवा पद्धत, जी लोकांना आराम मिळवून देते. विमान हे निसर्गाच्या नियमांवर आधारित तंत्रज्ञान आहे. दूरध्वनी निसर्गाच्या नियमांवर आधारित एक संरचना आहे. हे तंत्रज्ञान लोकांना सुविधा आणि आराम मिळवून देते. अध्यात्मदेखील असेच आहे. अध्यात्म हे निसर्गाच्या नियमांवरच आधारित आहे, जे मनाला एक परिपूर्ण आराम मिळवून देते. मी असं म्हणेन की अध्यात्म म्हणजेच एक संपूर्ण आराम.

प्रश्न: गुरुजी, मी एका कॉर्पोरेट कंपनीत प्रमुख पदावर आहे. दुर्दैवाने माझ्या कंपनीतील अनेक विभागांचे प्रमुख एकमेकांचा फार द्वेष करतात. हे माझे दुर्भाग्यच आहे. कृपया मला यावर काही उपाय सुचवा जेणेकरून मी माझ्या कंपनीतील सर्व विभाग नीटपणे सांभाळू शकेन.
श्री श्री: यावरचा उपाय तर सर्वचजण जाणतात. हे एक उघड रहस्य आहे. तुमच्या कंपनीतील त्या सर्व विभागप्रमुखांना आपला APEX’ हा कोर्स करायला लावा. आपल्या आर्ट ऑफ लीवींग च्या ‘APEX Program’ चे घोषवाक्याच आहे ‘Get into the team and let-out the steam’.
जगभरातील १००० पेक्षा जास्त कंपन्यांनी याचा लाभ घेतला आहे आणि घेत आहेत.

प्रश्न: प्रिय गुरुजी, मी YES कोर्सचा विद्यार्थी आहे. माझ्या शाळेचा अभ्यासक्रम खुपच जास्त आहे. परीक्षेच्या दिवसात, केलेला सर्व अभ्यास लक्षात ठेवणे मला जमतच नाही. माझ्या मनाची क्षमता वाढविण्यासाठी मला काही उपाय सुचवाल का?
श्री श्री: भरपूर आराम करा! संगीत ऐका. काहीतरी नाविन्यपूर्ण करा. काहीवेळ शांत बसणे आणि मोकळ्या हवेत फिरणे, याचा खूप फायदा होईल. निसर्गाचे निरीक्षण करणे हे फार उत्तम असते.

प्रश्न: गुरुजी, आपण ॐ हा मंत्र तीन वेळाच का म्हणतो?
श्री श्री: ॐकारचे तीन भाग आहेत. , आणि . म्हणून आपण तो तीन वेळा म्हणतो. तुम्ही असेही म्हणू शकता की, जसा आपण त्रिस्तरिय प्राणायाम करतो तसा ॐकारदेखील शरीराच्या खालच्या, मधल्या आणि वरच्या भागासाठी आहे, म्हणून आपण तो तीन वेळा करतो.
आपण जर तो चार वेळा म्हटला, तर तुम्ही विचाराल चार वेळाच का? तुम्हाला जर तो चार वेळा म्हणावासा वाटला तर तुम्ही तो चार वेळा म्हणू शकता. पाच वेळा म्हणावासा वाटला तर पाच वेळा म्हणू शकता.
जेव्हा आपण ॐकार कितीवेळा म्हणायचा ते ठरवतो तेव्हा तो फक्त एक अंक असतो. त्याला काही कारण असलेच पाहिजे असं नाही.

प्रश्न: गुरुजी, स्त्रियांच्या बाबतीत बाकी सर्व ठीक आहे; पण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये मत्सर जास्त प्रमाणात आढळतो. असे का?
श्री श्री: हे असं का होतं ते मलादेखील माहित नाही!
पण मला याबाबतीत असे सर्वसाधारण विधान करणे योग्य वाटत नाही. आजकाल पुरुषांमधेदेखील मत्सर भाव दिसून येतो आणि बर्‍याच स्त्रिया अनेक प्रसंग फार विचारपूर्वक हाताळताना दिसतात. सहजतेने दुर्लक्ष करून विसरूनदेखील जातात.
मत्सर हा एक भाव आहे आणि स्त्रिया जास्त भावनाप्रधान असल्याने कदाचित त्यांच्यात मत्सरभाव जास्त प्रमाणात जाणवत असेल. साधारणतः पुरुष जास्त बुद्धीजीवी असतात म्हणून त्यांच्यात हा भाव थोडा कमी प्रमाणात जाणवत असेल. पण असा काही नियम नाही.
मुलांनी मत्सर भावनेतून केलेले कितीतरी भयंकर गुन्हे आपण वर्तमानपत्रातून वाचतोच.

प्रश्न: गुरुजी, जिथे स्वच्छ खरेपणाला काही किंमत नाही अशा कॉर्पोरेट क्षेत्रात मुत्सद्दी व व्यवहारकुशल कसे रहायचे?
श्री श्री : काहीवेळा तुम्ही असा विचार करता की तुम्ही सत्य बोलत आहात आणि बरेचदा तुम्ही त्यासाठी निष्ठुर बनता. पण खरे बोलण्यासाठी निष्ठुर बनण्याची गरज नसते.
तुम्हाला माहित आहे की, जे लोक निष्ठूरपणे वागतात त्याचं असं म्हणणं असतं की ते सत्य बोलत आहेत आणि ते सत्य आहे म्हणून ते कठोर किंवा निष्ठुर आहेत. असे लोक त्यांच्या निष्ठुरपणामुळे इतरांना आवडत नसतात, त्यांच्यातील खरेपणामुळे नव्हे. खरेपणा आणि निष्ठुरपणा या दोन्ही गोष्टी आपण एकमेकांपासून वेगळ्या करू शकतो.
एक संस्कृत सुभाषित आहे त्याचा अर्थ मधुर असत्य आणि कटू सत्य कधीही बोलू नका. हे एक प्राचीन नाटक आहे.
तुम्ही कणखर आणि प्रेमळ असू शकता. तुम्हाला कणखर रहाण्यासाठी आडमुठे, असभ्य किंवा अशांत असण्याची गरज नाही. तुम्हाला प्रेमळ बनण्यासाठी फार प्रयत्न करण्याची गरज नाही फक्त सहज आणि प्रेमाने वागा.

प्रश्न: गुरुजी, माझे सर्व त्रास मी जर इथल्या टोपलीत टाकले, तर खरोखरच  माझे ते सर्व त्रास, मी इथेच असतानाच दूर होतील का? की ते पुन्हा माझ्याबरोबर माझ्या घरी येतील?
श्री श्री : तुम्ही तुमचे त्रास नुसते टाकायचे म्हणून टाकले असतील तर तुम्ही ते खरोखरच सोडलेले नसतात; आणि मग ते नक्कीच तुमच्याबरोबर परत येतील.

प्रश्न: गुरुजी, भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे? साधना आणि सेवा करतानादेखील काही वेळा वाईट भावना मनात येतात. मला खरोखरच यावर नियंत्रण ठेवता येत नाहीये
श्री श्री : त्याचे प्रमाण पहिल्यापेक्षा बरेच कमी आहे असे तुम्हाला वाटते का?
-           हो, साधारणतः ६०% तरी कमी
मग ही चांगली गोष्ट आहे. त्या कमी कमी होत जातील असा तुम्हाला विश्वास वाटतो का नाही. तुमचे उत्तर काय आहे?  

प्रश्न : आपल्या धर्मात उपासतापास आणि आचार फक्त स्त्रीयांसाठीच का आहेत, पुरुषांसाठी का नाहीत? पत्नी आपल्या पतीसाठी करवाचौथचा उपवास करते. आई आपल्या मुलांसाठी उपवास करते. पुरुष मंगळसुत्र का वापरत नाहीत? कुंकू का लावत नाहीत? आपला धर्म लिंगभेद मानणारा आहे का?
श्री श्री : तसे अजिबात नाही!
कदाचित पुरुषांनी हे नियम बनवले म्हणून ते स्त्रियांवर लादले गेले आहेत. खरे तर स्त्रिया ह्या घरी असत आणि त्यांना बराच मोकळा वेळ मिळत असे म्हणून त्यांनी स्वतःहून हे आचार अवलंबिले. आता कसे झाले आहे, पुरुष हे आचार पाळत नाहीत. स्त्रिया मात्र ते सर्व अत्यंत धार्मिक भावनेने आणि मनःपूर्वक पाळतात. स्त्रियांना घराबद्दल आणि घरातल्या सर्वांबद्दल जास्त आपुलकी असते म्हणून त्या घरातील सर्वांची फार काळजी घेतात. पण पुरुष मात्र कामानिमित्त जास्त वेळ बाहेरच असतात.
पूर्वी पुरुषदेखील एकादशीचा उपवास करत. हल्ली पुरुष काहीवेळा हे पाळत नाहीत पण पुरुषांनीदेखील हे सर्व आचार पाळणे अपेक्षित आहे. पुरुषांनी टिळा लावला पाहिजे, लग्न झालेल्या पुरुषाने जानवे घातले पाहिजे. या देशात स्त्री आणि पुरुष दोघांनीही काही धर्माचर पाळले पाहिजेत.
खरे तर आपल्या देशात स्त्रियांचा जास्त आदर केला जातो. आपण प्रथम राधे म्हणतो आणि मग श्याम, प्रथम सीता नंतर राम. आधी गौरी मग शंकर. पुरातन काळापासून स्त्रियांचा फार सन्मान ठेवला जातो. स्त्री आणि पुरुष समानच आहेत. खरे तर आपल्या देशात पुरुषांपेक्षा स्त्रियांना एक पायरी वरचेच स्थान आहे.
तुम्हाला माहित आहे, प्राचीन काळापासून भारतात स्त्रीधन अशी एक संज्ञा आहे. या संपूर्ण खंडात; भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका, मलेशिया आणि सिंगापुरमध्ये पुरुष एक ठराविक रक्कम घरात स्त्रियांना देतात. त्या पैशांना कोणीही हात लावू शकत नाही. त्याला स्त्रीधन म्हणतात. हे असे धन आहे जे स्त्रीने घरात वाढवायचे असते.
स्त्रीभ्रूणहत्या ही सर्वात वाईट गोष्ट सध्या आपल्या देशात घडते आहे, अशा देशात जिथे स्त्रियांना इतर कशाहीपेक्षा खूप सन्मान दिला जात होता. गोहत्या हे फार मोठे पाप आहे, असे मानले जात असे. १०० गायी मारणे हे एका विद्वानाला मारण्यासारखे आहे. १०० विद्वानांना मारणे हे एका संताला मारण्यासारखे आहे आणि १०० संतांना मारणे हे एका लहान मुलीला जखमी करण्यासारखे आहे. याचा अर्थ काय झाला? एका लहान मुलीला त्रास देणे हे १ लाख गायी मारण्याचे पाप करण्यासारखे आहे. म्हणून स्त्रियांना नेहमीच उच्च स्थान दिले गेले आहे.

प्रश्न : गुरुजी, मी आपले ‘God Loves Fun’ हे पुस्तक वाचले आहे. आपण ज्यावर प्रेम करतो त्यावर हक्क सांगू नये. याचा अर्थ असा होत नाही का की, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याशी लग्न करू नये? लग्न हे हक्क सांगण्यासारखे आहे का?
श्री श्री: मी असं कधीही म्हणत नाही! निवड तुमची आहे, माझे आशीर्वाद आहेतच. लग्नाच्या आधी काय किंवा लग्नाच्या नंतर काय, तुम्ही जर फारच अधिकार गाजवत असाल तर दुसरी व्यक्ती पळून जाईल. एखाद्याला नियंत्रणात ठेवणे किंवा एखाद्यावर मालकी गाजवणे ही काही चांगली गोष्ट नाही.

प्रश्न: गुरुजी, मला वाचवा. मी माझ्या वरिष्ठांशी खोटे बोलून अडवान्स कोर्स ला आलो आहे. आणि आता माझ्या वरिष्ठांना मी आश्रमात आहे हे कळले आहे. आता मी माझ्या वरिष्ठांच्या संतापापासून मला कसा वाचवू?
श्री श्री : काळजी करू नका!
जर तुम्ही आजारपणाची सुट्टी घेतली असेल किंवा मी आजारी आहे असे सांगून आला असाल, तरी तुम्ही त्याचे समर्थन करू शकता. आजारपण हे फक्त शारीरिकच असते असं नाही. मानसिक आणि अध्यात्मिकसुद्धा असू शकते. बरेचदा लोक अध्यात्मिकदृष्ट्या आजारी असतात. जेव्हा तुम्ही आनंदी नसता तेव्हा तुम्ही आजारीच असता. तुम्ही आयुर्वेदिक उपचारगृहातच आला आहात असं त्यांना सांगा. उद्या सकाळी जाऊन नाडी परीक्षा करून घ्या. तुमचे असंतुलन संतुलित करण्यासाठी तुम्ही इथे आला आहात, असे तुम्ही त्यांना सांगू शकता, अन्यथा तुमचे काम व्यवस्थित कसे होईल? त्यासाठी तुम्ही मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या संतुलित असणे आवश्यक आहे.

प्रश्न : गुरुजी, आपण जे पाहतो, ऐकतो ते सत्य नाही. तरीही आपले मन या जीवनाचा आणि या जगाचा अनुभव घेते. म्हणजे जर आपल्या कृतींपैकी ९९.९% कृती या असत्यावर आधारित असतील तर त्या कृतींमध्ये सहभागी होण्यात काय अर्थ?
श्री श्री : कृती यादेखील सत्य नाहीत!
ज्या कृती आपण करतो त्या ख-या नाहीत. जर काहीही खरे नसेल तर तुमचे विचारच काय, तुमच्या सर्व कृतीदेखील ख-या नाहीत.

प्रश्न : माझ्या मुलाची कमाई उत्तम आहे, मी सेवानिवृत्त आहे. पण मी त्याला न सांगता त्याच्या पैशातून काही रक्कम काढून घेतो आणि समाजकल्याणासाठी वापरतो. मला असे करणे योग्य वाटत नाही. असे मला वाटते की मी चोरी करतो आहे आणि मला याची सवय तर लागणार नाही ना? मी असे का करतो, ते मला कळत नाही, पण मी स्वतःला थांबवूदेखील शकत नाही.
श्री श्री : याला चोरी म्हणू नका!
तुम्ही जर काही चांगले काम करत आहात तर तुमच्या मुलाला तसं सांगा की तुम्हाला काही ठराविक रक्कम समाजकल्याणासाठी खर्च करावयाची आहे आणि हे खर्च एका ठराविक मर्यादेपर्यंतच करा.
तुमचा मुलगा यासाठी तयार नसेल तरी काही काळजी करू नका.
तुम्ही जर एकाच घरात एकत्र राहता तर हे त्याचे पैसे आणि हे माझे पैसे असा तुम्ही विचार करण्याची काहीच गरज नाही. घरातील पैसे हे घरातील सर्वांचेच आहेत.
तुम्ही हे घर बांधले आहे, ज्यामध्ये तुम्ही दोघेही एकत्र राहता. त्याबद्दल तुम्ही त्याच्याकडून काही घरभाडे घेत नाही. बरोबर ना?  
तुम्ही समाजकल्याणाचे, गरीब मुलांना मदत करण्याचे पवित्र काम करत आहात. तुम्ही करीत असलेल्या मदतीमुळे त्या असहाय्य मुलांना किती आनंद मिळतो तो पहा. म्हणून तुम्हाला अपराधी वाटण्याचे काहीच कारण नाही.
कोणी दारू पिण्याकरिता, नाहीतर तसेच काही वाईट काम करण्यासाठी पैसे चोरत असेल तर ते नक्कीच वाईट आहे.

प्रश्न : गुरुजी, मी जेव्हा एखाद्याला बघतो तेव्हा मला वाटते की तो माझ्यापेक्षा जास्त चांगला आहे आणि मग मला कमीपणा वाटू लागतो. मी जसा आहे तसा मला मान्य करू  शकतच नाही. मी काय करू?
श्री श्री : जीवनाकडे मोठ्या दृष्टीकोनातून पहा!
असे खूप लोक आहेत जे तुमच्यापेक्षा चांगले आहेत आणि असे करोडो लोक आहेत जे येतील आणि तुमच्यापेक्षा चांगले होतील. मग तुम्ही काय करणार?
तुम्ही तुलना कशासाठी करता?
देव सर्वांवर प्रेम करतो आणि तो तुमच्यावरदेखील प्रेम करतो; हे लक्षात ठेवा.
प्रत्येकाची जगण्याची स्वतःची अशी शैली असते आणि स्वतःचा असा विश्वास असतो. तुम्हाला जे मिळाले पाहिजे ते तुम्हाला मिळेलच.
तुम्ही बुद्धिमान असाल, तरच तुम्ही यशस्वी व्हाल असा काही नियम नाही. ते अशा पद्धतीने घडत नसते. तुम्ही जर सभोवताली पहिले तर तुम्हाला दिसेल की, एखादी व्यक्ती, ज्याची सामान्य कारकुनी करण्याचीदेखील पात्रता नाही, ती करोडपती बनली आहे. म्हणजे नशीब नावाचे काही खरोखरच आहे आणि हे नशीब तुम्हाला तुमच्या मार्गावर नक्कीच भेटेल. हे सत्य मान्य करा आणि स्वतःची दुस-याबरोबर तुलना करणे बंद करा. तुम्ही चांगले आहात हे लक्षात घ्या. तुमचे हृदय जर निर्मळ असेल तर तुम्ही प्रेमळ असता आणि तुम्ही प्रेमळ असाल तर सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतात.  


The Art of living
© The Art of Living Foundation