पूजा म्हणजे दैवी वातावरण तयार करणे आणि त्यामध्ये विश्राम 
करणे !

१७ डिसेंबर २०११

प्रश्न: गुरुजी, एखादी गोष्ट कशी ‘सोडून द्यायाला’ कसे शिकायचे?
श्री श्री : एक खोल श्वास घ्या आणि धरून ठेवा. बास! आता तुम्हाला कळेल कसे सोडून द्यायचे ते.

प्रश्न: गुरुजी, समुद्रातील लाटा वरती जातात आणि मग खाली येतात. पण तुम्ही म्हणालात कि चित्त  खोल (अंतर्मनात) जाते आणि नंतर विरघळून जाते. मग आपण चित्त खोल (अंतर्मनात) कसे न्यावे?
श्री श्री: प्रयत्न करणे सोडून द्या. जेंव्हा तुम्ही विचार करता कि मला अमुक करायचे आहे आणि मला तमुक करायचे आहे, मग तुम्ही कृती करणे ‘सोडून देऊ शकत नाही. त्या वेळेस चित्त हे वरच्या थरात राहते. जेंव्हा तुमच्यामध्ये फक्त ‘सोडून देण्याची’ क्षमता असते, तेंव्हा चित्त खोलवर जाते.

प्रश्न: गुरुजी, मागचे २ दिवस ‘टीचर्स रिफ्रेशर मिट’ मध्ये मी तुमच्याकडून खूप काही ज्ञान ऐकले आहे. हे सर्व मी कसे ग्रहण करू, कि जेणेकरून योग्य वेळी मी त्याचा वापर करू शकेन?
श्री श्री : मी तुम्हाला सांगतो कि तुम्ही स्वत:बद्दल अजिबात संशय घेऊ नका. ‘मी हे ऐकले आहे, पण हे कृतीत येईल का, हे असे खरच आयुष्यात होईल का नाही’?, हा स्वत:बद्धलचा संशय आहे. अजिबात असा संशय घेऊ नका. तुम्ही बालवाडीमध्ये शिकता, २+२ = ४, एकदा तुम्ही ते शिकलात कि ते कायम तुमच्याबरोबर राहते. जेंव्हा तुम्हाला मोजणी करायची असते, तुम्ही म्हणता, २ + २ = ४, ते आपोआप तुमच्या वापरात आले आहे. तुम्हाला ते मुद्दामहून वापरायची गरज पडत नाही. ते आपसूकच होते. म्हणून ‘माणसांना असतील तसे स्वीकार करा’ किंवा ‘वर्तमान क्षण हा टाळता येत नाही’, हे जर तुम्ही जाणले असेल तर जेंव्हा तुम्ही अस्वस्थ असता, तेंव्हा हे ज्ञान उस्फुर्तपणे येते.’ओह, हा क्षण टाळता येणार नाही. तसेही आपण काय करू शकतो? झाले ते होऊन गेले.’ हे आपोआप कळते, ज्ञान ऐकणे म्हणजे, प्रोग्राम केले गेल्यासारखे आहे. त्यांनतर जेंव्हा आणि जशी गरज असेल तसे ते ज्ञान विनाप्रयात्न येत जाते. ‘ मला हे ज्ञान आयुष्यात वापरायचे आहे’, असा विचार करणे हा खूप मोठा तणाव आहे.. ‘मला ही सर्व माहिती कॉम्प्युटर मध्ये घालायची आहे’, असे जेंव्हा तुम्ही म्हणता, याचा अर्थ ती माहिती तिथे आधीपासून नाहीये.
पण मी तुम्हाला सांगतो, कि एकदा का तुम्ही हे ज्ञान ऐकले, कि तुमच्यामध्ये पक्के झालेले असते. तुम्ही ते आधीच ग्रहण केलेले असते. म्हणूनच ते गरजेनुसार तुमच्या मदतीला आपोआप येते. ह्या ज्ञानाचा वापर करणे किंवा न करणे, याबद्दल फार काळजी करू नका.
तुम्ही थोडा वेळ पुस्तकातून याची उजळणी करा किंवा रोज फक्त १० मिनिटे हे ज्ञान ऐका, मग त्याचा आपोआप उपयोग व्हायला लागेल. जर तुम्ही खूप दिवस काहीच ऐकले नसेल किंवा खूप दिवस तुम्ही या सगळ्यापासून दूर असाल, तर मात्र तुम्ही विसरून जाल. जर हे (ज्ञान) तुमच्या लक्षात असेल, तर त्याचा वापर उस्फुर्त होतो. आणि जर का तुम्ही हे विसरला असाल तर कोणीतरी तुम्हाला त्याची आठवण करून देणे गरजेचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला सत्संग ला यावे लागेल, TRM ला यावे लागेल किंवा परत कोर्स करावा लागेल आणि ज्ञानाला पुन्हा ताजे करावे लागेल, स्मरणशक्तीला उजाळा द्यावा लागेल.

प्रश्न: गुरुजी, आम्हाला माहिती आहे कि आम्ही नियमितपणे साधना केली पाहिजे. पण कधीकधी खूप कंटाळा येतो. अशा वेळेला काय करावे?
श्री श्री : व्यायाम करणे हे नेहमीच कंटाळवाणे असते. पण तरीही आपल्याला माहित आहे कि चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला तो करायला पाहिजे. जसे अन्न खाणे हेही कंटाळवाणे आहे, पण तरीही ते करावे लागते. साधनाही कंटाळवाणी असू शकते, पण तरीही आपल्याला ती करायला पाहिजे. तो तुमच्या दिनचर्येचा एका भाग बनवा, काही काळ शांत बसून भस्त्रिका करा. तुम्हाला ‘ट्रेडमिल’ वर चालायचे नसले तरी तुम्ही ते करता, कारण तुम्हाला माहित आहे कि हे आरोग्यासाठी चांगले आहे, त्याच प्रकारे तुम्ही साधना करायला हवी. एखाद्या दिवशी नाही जमले तरी हरकत नाही. त्याबद्दल वाईट वाटू घेऊ घेऊ नका.पण ते ‘न जमणे’ रोजचेच झाले तर मात्र तुम्हाला नीट विचार करावा लागेल. म्हणून समूहाने मिळून साधना केलेली चांगली. संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे,’ जेंव्हा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तेंव्हा तो दोघातिघांनी मिळून करणे हे जास्त फायदेकारक असते.’ बऱ्याचदा तुम्ही कोणीतरी संगतीला आहे म्हणून काही गोष्टी करता. मी बऱ्याचदा लोकांना बोलताना ऐकले आहे कि, ‘मी बरोबर कोणी असल्याशिवाय दारू पीत नाही’. जेंव्हा तुम्ही फक्त संगत आहे म्हणून अयोग्य गोष्ट करता, तर त्याचसाठी तुम्ही काहीतरी चांगलेही करू शकता.’

प्रश्न: गुरुजी, जेंव्हा मला वाटते कि मी अयोग्य सवयी, अयोग्य विचार, वाईट भावना किंवा अयोग्य मानसिकता सोडून दिली आहे आणि मी विचार करतो कि,’मी हे प्राप्त केले आहे’, त्याचवेळेस नेमकी  माझ्यासमोर काही आव्हाने येतात.हे असे का होते?
श्री श्री: ‘मी हे प्राप्त केले आहे’ हा विचार आणि एखादी गोष्ट प्राप्त न होणे, याचा संबंध लावणे बंद कर.
कधी कधी तुम्ही विचार करता, कि ‘ मला हे करायचे आहे’ आणि ते घडत नाही. बऱ्याचदा तुमची इच्छा शक्ती कमी पडते आणि दुसऱ्या कोणाचा तरी संकल्प जिंकून जातो. म्हणून त्याबद्दल जास्त विचार न करणे हे योग्य., नाहीतर तुम्हाला अपराधी वाटू लागते, स्वाभिमान खच्ची होतो आणि मग मन:स्ताप आणि अस्थिरता निर्माण होते. सर्वात चांगले म्हणजे हे सोडून द्या, एक नवीन संकल्प करा आणि पुढे चला.
जेंव्हा तुम्ही काही संकल्प करता, तेंव्हा काही काळासाठी तरी तुम्ही सुरक्षित होता. समजा तुम्ही ठरवलेत, कि मी ‘ गरजेपेक्षा जास्त खाणार नाही’, तुम्ही कमीतकमी १५ दिवस, महिन्यासाठी तरी तसे वागता आणि नंतर ते सोडून देता.जेंव्हा तुम्ही परत जास्त खाता, तुम्हाला त्रास होतो. मग परत तुम्ही संकल्प करता. मग ‘माझ्याच्याने हे होणारच नाही, मी जास्तच खात राहीन’ असे म्हणण्यापेक्षा, पुन्हा नवीन सुरुवात करा, ‘ठीक आहे, आजपर्यंत जरी मी जास्त खात असलो, तरी आजपासून परत कमी खाणे सुरु करेन.’ वेळोवेळी असा संकल्प करा. तो तुटला तरी हरकत नाही. असा संकल्प तुम्हाला एक पूल पुढे नेत असतो. म्हणून कधीही तुमचा निश्चय सोडू नका. १० वेळेला तुटला तरी परत करा.
जर तुमच्यामध्ये सिगाररेट ओढणे, किंवा मद्यपान करणे किंवा संभोग करणे किंवा इतर काही अयोग्य सवयी असतील आणि स्वत:शीच केलेला निश्चय पाळू शकत नसाल, तरी मी सांगतो कि प्रयत्न सोडू नका.१० वेळेला जरी अपयश आले तरी पुन्हा निश्चय करा.
समजा तुम्ही अजिबातच असे ठरवले नसते, तर काय झाले असते? तुम्ही कायमच जास्त खात राहिला असता.तुम्ही कायम अयोग्य सवयींमध्ये गुंतून पडला असता. तुमच्या निश्चयामुळे कमीतकमी महिना-पंधरा दिवस, २ महिने किंवा वर्षभर तरी तुम्ही त्यापासून लांब राहिलात.
म्हणून संकल्प तुटला तरी पर्वा नाही, परत करा.
ह्याचा तुम्हाला पुढे उपयोग होईल. यामुळे त्मची उन्नती होईल आणि योग्य दिशेने प्रगती होऊ लागेल. आणि एक दिवस लक्षात येईल कि फारसा प्रयत्न न करताही सर्व काही सोपे झाले आहे. स्वाभाविकपणे सर्व काही जमून गेले आहे. आणि यामुळे तुम्हाला मुक्त वाटेल. अंतरंगातील मुक्ती, स्वतंत्रता जाणवू लागेल. पण त्यासाठी तुम्ही योग्य पावले उचलली पाहिजेत.

प्रश्न: गुरुजी, तुमच्या मते आम्ही आमचे उर्वरित आयुष्य कसे घालवावे? एक अनुयायी म्हणून का भक्त म्हणून?
श्री श्री: तुम्हाला असे वाटते का कि भक्त अनुयायी नसतात आणि अनुयायी भक्त नसतात?
स्वत:ला अशा कुठल्याही प्रकारच्या ‘ओळखीमध्ये’ मर्यादित न करणे चांगले. मला वाटते कि तुम्ही आनंदी, समाधानी असावे आणि सर्वोच्च अशा ज्ञानप्राप्तीची ईच्छा असू द्यावी.
आत्मसाक्षात्काराचा ध्यास धरून तुम्ही आयुष्यात पुढे जावे. तेच तुमचे जीवन योग्य दिशेला घेऊन जाईल.तुम्हाला तहान असेल तरच ती शमवली जाईल. पण तर तृश्नाच नसेल, तर ती भागवण्याचा प्रश्नच येत नाही.

प्रश्न: गुरुजी, दर वेळेस तुम्ही धरतीवर असाल तेंव्हा मीही इथे येऊ शकतो का?कृपया तुम्ही जिथे जाल तिथे मला घेऊन चला.
श्री श्री : ठीक आहे, तसेच करीन. मी खूप काळानंतर येतो. तुम्हाला त्याच्या आधी मधल्या वेळातही कधीतरी यावे लागेल.

प्रश्न: गुरुजी, मी आत्ता आश्रमामध्ये जी खुशी अनुभवत आहे, तशीच ती मी परत घरी गेल्यावरही राहील का?
श्री श्री: ही ज्योत तेवती ठेवणे हे तुमच्या हातात आहे. हा असाच आनंद टिकवून ठेवणे हे तुमच्या पुढचे आव्हान आहे. तुम्ही ते कसे ठेवलं? हे ज्ञान ऐकत राहा आणि तुम्हाला स्वत:ला या ज्ञानामध्ये ताजेतवाने ठेवत रहा. दररोज थोडा वेळ ज्ञानाबद्दल काही ऐका किंवा ज्ञानाचे पुस्तक वाचा. जेंव्हा तुम्ही गाडी चालवत असाल, तेंव्हा ज्ञानाची CD लावून ठेवा. जेंव्हा तुम्ही वाहतूक कोंडीत सापडाल, तेंव्हा काहीतरी उलटसुलट विचार करण्यापेक्षा किंवा काही निरुपयोगी गाणी ऐकण्याऐवजी, ज्ञानाचे चिंतन आणि मनन करा.
मी असे म्हणत नाहीये कि तुम्ही गाणी म्हणूच नका. संगीत महत्त्वाचे आहे पण त्याचबरोबर थोडा वेळ ज्ञानाचाही विचार करा. ते आणि तुमची साधना तुम्हाला उपयोगी ठरेल.

प्रश्न: प्रिय गुरुजी, मला तुमच्यामध्ये देव दिसतो आणि मी तुमच्यामध्ये देवत्त्वाचा अनुभव करतो. तुम्हाला सर्वसाधारण मानवाप्रमाणे पूजा करण्याचे काय कारण?
श्री श्री : तुमचे पूजेच्या बाबतीत गैरसमज आहेत. पूजेचा नियम असा आहे कि फक्त शिवाच शिवाची पूजा करू शकतात. म्हणून प्रथम तुम्ही वेगवेगळया देवतांची नावे आपल्या शरीराच्या वेगवेगळया भागांना देता.
तुम्ही स्वत: दैवी शक्तीचा एक भाग होता आणि नंतर फुले आणि इतर गोष्टी देवाला वाहता. ही पूजेची  मूळ आणि योग्य पद्धत आहे, स्वत:मध्ये देवाला बघणे.
मी जितका या दैवी शक्तीचा अंश आहे, तेवढेच तुम्हीही आहात. तुम्ही तुमच्यामधेही देव ओळखला पाहिजे. देव तुमच्यामधे आहे आणि माझ्यामधेही. हे तुम्हाला पाहता आले तर चांगलेच आहे. तुम्ही. म्हणायला पाहिजे, ‘मी गुरुजींचा एक भाग आहे’.स्वत:ला दोष देणे थांबवून बघा कि तुम्ही गुरु, देव आणि सर्व विश्वाचे (एक भाग) आहात .
मी पूजा का करतो? मला त्यापासून काही मिळते का? नाही.माझ्या पूजा करण्या अथवा न करण्याने काही फरक पडत नाही. पण तो एक रिवाज आहे. जर मी पूजा केली तर इतरही सर्वजण करतील.हे एक उदाहरण समोर ठेवण्यासाठी आहे. भगवान कृष्ण आणि भगवान राम हे सुद्धा पूजा करीत असत. म्हणून जसे आपले पूर्वज करायचे तसे रिवाज चालू ठेवावेत. जर मीच नाही केली तर इतर कोणी ते का करेल?आणि मी त्यांनाही पूजा करायला कसे सांगू शकेन?
मला प्राणायाम, क्रिया,ध्यान किंवा सत्संग करण्याची गरज नाही. पण जर मी हे केले नाही, तर मी इतरांना ध्यान आणि सत्संग करण्याची प्रेरणा कशी देऊ शकेन? म्हणून मीही ध्यान करतो.
माझ्यासाठी डोळे उघडे असणे काय आणि मिटलेले काय, सारखेच आहे.
हाच प्रश्न अर्जुनाने कृष्णाला विचारला होता. कृष्णाने सांगितले होते कि ‘माझ्यावर काहीच कर्म नाही आहे. मला कर्म करून काही मिळवायचे नाही किंवा ते न केल्याने मी काही गमावणार हि नाही. पण तरीही मी ते करत राहतो. का? कारण मी केले नाही तर लोकही ते करणार नाहीत.ते इतर काही न करता माझे अनुकरण करतील आणि त्यामूळे संकट येईल. उदाहरण समोर ठेवण्यासाठी मी हे सर्व काही कर्म करत आहे. तुम्हीही हे करा.’
अर्जुन म्हणाला,’नाही, मी हे करणार नाही;. कृष्णाने सांगितले,’तुला हे करावेच लागेल.’ अर्जुनाने विचारले, ‘का? जर कर्म हे बंधनात टाकते तर तू मला हे कर्म करायला का सांगत आहेस? तू म्हणालास ज्ञान हेच मुक्तीप्रत नेते, मग मला हे सर्व करण्याचे काय कारण’?
कृष्णाने उत्तर दिले, ‘मलाही हे करण्याची गरज नाही, पण तरीही मी हे करतो आहे आणि तुही ते करावेस’.
पूजा म्हणजे एक दैवी वातावरण तयार करणे आणि त्यामध्ये विश्राम करणे. नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. त्यामध्ये हजारो वर्षांपासूनच्या लहरी आहेत. जसे कि कंप काटा (tuning fork), जेंव्हा एकसारखी कंपने असतात तेंव्हा त्यामधेही कंपने निर्माण होतात. त्याचप्रमाणे, जेंव्हा तुम्ही मंत्रजप करता, तुमच्यातील हजारो वर्ष जुने चैतन्य जागृत होत जाते.म्हणूनच जेंव्हा तुम्ही ते मंत्र ऐकता, तुमच्यामध्ये काहीतरी घडते. हे मी संपूर्ण जगभरात बघितले आहे, फक्त भारतात नाही.
सुरुवातीला जेंव्हा आपण ‘ओम नमः शिवाय’ म्हणतो, तेंव्हा असेही लोक ज्यांना या संस्कृत शब्दांविषयी फार आस्था नाही तेहि येऊन सांगतात कि,’ अंतरंगामध्ये काहीतरी होते’.
आपले चैतन्य खूप पुरातन आहे आणि म्हणून ‘वेदिक मंत्रांमध्ये’ सखोल जाऊन त्या चैतन्याला स्पर्श करण्याचे सामर्थ्य आहे.आता तुम्ही विचारलं कि, आपण’ जर्मन,फ्रेंच, कन्नड,उर्दू ,तेलुगु, असामी किंवा तमिळ भाषेत का गाणे म्हणून नये?’.तुम्ही  कोणत्याही भाषेत गाऊ शकता.पण वेदिक मंत्रांचा परिणाम वेगळाच आहे.म्हणूनच त्यांना मंत्र म्हटले जाते. जे तुमचे चित्त सगळ्याचा पार घेऊन जाते, ते मंत्र. ह्या महा मंत्रांचा आपल्या चैतन्यावर खूप परिणाम होतो आणि म्हणूनच आपण ‘ओम नमः शिवाय’ किंवा ‘ओम नमो नारायण’ यासारखे मंत्र म्हणतो.
भजन हे वेगळी असतात. तुम्ही ‘राधे श्याम’ गाऊ शकता. भजनस किंवा इतर भाषांमधील गाणी हे वेगळी आहेत.पण तुम्ही जेंव्हा ‘ओम्’ म्हणता, त्याचा चैतन्यावर होणारा परिणाम अत्यंत पवित्र आहे.

प्रश्न: गुरुजी, मी दुख्खी असताना दुख्खी कविता लिहितो. कुठूनतरी शब्द बाहेर पडतात.हेच मी खुश असतो तेंव्हा होत नाही.असे का?
श्री श्री: तुम्ही जेंव्हा आनंदी असता, तेंव्हा तुमचे चैतन्य विस्तारले जाते आणि दुख्खा:मध्ये ते केंद्रित होते. म्हणून होत असावे.
जेंव्हा तुम्ही आनंदी असता पण आतुर नसता, शांत आणि आनंदी असता, तेंव्हा सृजनशीलता उफाळून येते. जेंव्हा तुम्ही आतुर असता, तेंव्हा चित्तामध्ये अशांती असते आणि विस्तारही असतो.जेंव्हा तो असमतोल कमी होतो, तेंव्हा खरा आनंद वर येतो आणि नवनिर्मिती त्यामधून तयार होते.

प्रश्न; बेसिक कोर्स मध्ये आपण शिकलो आहोत कि, ‘ माणसांना आणि परिस्थितीला असेल तसे स्वीकार करा’. माझ्या कामाच्या ठिकाणी जेंव्हा दररोज माझे वरिष्ठ माझा अपमान करतात, तो मी कधीपर्यंत सहन करू?
श्री श्री: असे बघ कि तू आधीच त्यांना स्वीकार केले आहेस आणि म्हणूनच अजूनही तू तिथे काम करतोस. हा तुम्ही काय निवडता याचा प्रश्न आहे. जर तुम्हाला याहून चांगली नोकरी कुठे मिळत असेल, तर इथला निरोप घ्या.
पण जर तुम्हाला इतर कुठेही नोकरी मिळत नसेल आणि आत्ता जर तुमच्या कुटुंबाला (आर्थिक) मदतीची गरज असेल, तर चालू ठेवा.

प्रश्न: गुरुजी, सुरुवातीला कृष्णासाठी असलेले गोपींचे प्रेम हे बंधनकारक आणि सापेक्ष होते.. परंतु नंतर तेच प्रेम निरपेक्ष प्रेमात बदलले गेले.हे असे आय झाले?
श्री श्री: ज्ञान आणि ज्ञानाच्या अनुभवातून. जेंव्हा तुम्ही हे जाणता, कि तुम्ही स्वत:ला  पकडून आणि धरून ठेवू शकत नाही, तेंव्हा तुम्हाला ते सोडून द्यावेच लागते.

प्रश्न: जर जीवन हे एक स्वप्न आहे, तर मग सत्य असा आत्मा कसा जाणावा?
श्री श्री : तुम्हाला सत्य आत्मा समजू शकत नाही.तुम्हाला हे कळू शकते कि हे सर्व काही बदलणारे आहे.जेंव्हा तुम्हाला कळते कि सर्व काही बदलते आणि हे जो अनुभव करतो, तो (आत्मा) बदलत नाही. त्या न बदलणाऱ्या अस्तित्वाशिवाय तुम्ही घडणारे बदल ओळखूच शकत नाही. कोणत्याही (न बदलणाऱ्या) संदर्भाशिवाय, तुम्ही कसे ओळखाल कि काहीतरी बदलले आहे. हा जो संदर्भ आहे, तो समजून घेण्याची गोष्ट नाही तर समजून घेणारा स्वत:च आहे. जर तुम्हाला सर्व काही समजून घेण्याची गोष्ट वाटत असेल, तर ते शक्य नाही. ते जे परम सत्य आहे, त्याला समजून घेण्याची वस्तू समजू नका.

प्रश्न: गुरुजी, आपल्या धरतीवर, आपल्या पर्यावरणाचे, निसर्गाचे काय होत आहे याबद्दल काही सांगाल का? मी जरी स्वत:ला चांगला माणूस बनवायचा प्रयत्न केला तरीही मला रोज काळजी वाटत राहते.
श्री श्री : निराश होऊ नका. निसर्गाला सर्व समजते. त्याने खूप लोकांना झाडे लावण्याची, तळी आणि नद्या यांची काळजी घेण्याची इच्छा दिली आहे आणि आजकाल लोक पर्यावरणाच्या प्रती खूप सजग आहेत. आपण योग्य दिशेने वाटचाल करीत आहोत. आर्ट ऑफ लीवींग नि ५९.५ दशलक्ष झाडे लावण्याची प्रतिज्ञा केली आहे. आपल्या स्वयंसेवकांनी खूप काम केले आहे. आपल्यातुमच्यासारख्या या धरतीचे दुख्ख: समजणाऱ्या लोकांची गरज आहे.तुम्ही आणि आजचे तरुण मिळून तुमच्या आयुष्यातील एक वर्ष या किंवा तुम्ही जिथे राहता त्या देशासाठी द्या, १ वर्ष, त्या देशाला चांगले बनवण्यासाठी.
तुमची नोकरी आणि बाकीच्या बांधीलकी बाजूला ठेवा, एक वर्षाची रजा घ्या. ‘माझ्या आयुष्यातील एक वर्ष मी माझ्या देशासाठी आणि पर्यावरणासाठी देणार आहे.दारिद्र्य नष्ट करण्यासाठी, मानवी मूल्यांसाठी आणि तणावमुक्त, हिंसामुक्त जगासाठी.’ अशा निश्चयाने जर तुम्ही पुढे येऊन समाजासाठी १ वर्ष , फक्त १ वर्ष दिलेत तर त्याने खूप फरक पडेल.आज शेकडो हजारो आर्ट ऑफ लीवींग चे प्रशिक्षक नि:स्वार्थपणे समाजासाठी काम करत आहेत.त्यांना काय गरज आहे? साधे अन्न आणि राहण्यासाठी साधी जागा आणि हे सर्व पूर्ण होत आहे. याचसाठी संघटना आहे कि त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण होत आहेत आणि त्यांना अजून काही नको आहे.ते रात्रंदिवस काम करत आहेत. आपल्याकडे खूप पूर्ण वेळाचे प्रशिक्षक आहेत. त्यांनी त्यांचे आयुष्य मानावातेसाठी, सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी दिले आहे. आणि त्यांना त्यातून खूप आनंद मिळत आहे. जेंव्हा तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद आणता, त्यावेळेस तुम्हाला खूप समाधान मिळते. तुम्ही समाधान विकत घेऊ शकत नाही. आमच्या प्रशिक्षकांना जे समाधान मिळते तसे दुसरे काहीही तुम्हाला देऊ शकत नाही.ते फार छान आहे.
आपल्याला अजून काम करायचे आहे. तुमच्यापैकी ज्यांना समाजासाठी काहीतरी करायचे आहे, आपण एकत्र काहीतरी चांगले करू शकतो. एकट्याने तुम्ही फार काही साधू शकत नाही.एकता माणूस दिल्ली किंवा यमुना नदी साफ करू शकत नाही. पण रोज हजारो लोकांच्या एकत्र परिश्रमाने तो उपक्रम यशस्वी झाला.

प्रश्न: धन्यावाद गुरुजी. शेवटी प्रश्न विचारायची माझी वेळ आली !
श्री श्री : ओह्ह, तू इतका वेळ प्रश्न मनात धरून होतास तर.पण तू माझी बाकीच्या प्रश्नांची उत्तरे ऐकलीस का नाही?
(उत्तर: अर्धी ऐकली)
अर्धीच! जेंव्हा तुम्ही एकाच प्रश्नाला चिकटून राहता, तेंव्हा असेच होते. जर मला तुझ्या प्रश्नाचे उत्तरच माहित नसेल तर काय होईल? तू तो प्रश्न सोडून द्यायला तयार आहेस? सोडून दे तो प्रश्न.

प्रश्न: गुरुजी, मला स्थितप्रज्ञ राहायचे आहे, ना आग्रही ना नकारार्थी.जेंव्हा मी माझ्या नवऱ्याला सांगते कि ‘ मला तुझ्याशी काही अडचण नाही. तुला पाहिजे ते तू करू शकतोस. हे खूप नकारार्थी वाटते. जर मला त्यामुळे मोकळे वाटत असले तरीही ते नकारार्थी आहे का?
श्री श्री : हो,जेंव्हा तू त्याला सांगतेस कि ‘ तू काहीही कर, तरीही मला काही वाटणार नाही’, त्याला असे वाटू शकते कि तुला त्याची पर्वा नाही.जर तुला मोकळे वाटत असेल, तर मग ते चांगले आहे. शब्दांमधे काय ठेवलेय?
तू काही बोललीस, तो काही बोलला किंवा अजून इतर कोणी काही बोलले, हे चालूच राहते.हे सगळे सोडून काळजी मुक्त हो. आनंदी राहा!
तुमचे हृदय शुद्ध ठेवा.कधी कधी चुकून काही शब्द तुमच्याकडून निघून जातात किंवा कधी इतर लोकसुद्धा मनात नसता काही बोलून जातात.कुठलीही आई मुलाला ‘निघून जा’ असे मनापासून सांगणार नाही.पण तरीही ती कधीतरी मुलांना सांगते, ‘निघून जा! मला त्रास देऊ नकोस.’
म्हणून लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका.शब्दांच्या पलीकडले बघा.लोक काय म्हणतात याने मला काही फरक पडत नाही. हि सगळी मौज आहे. म्हणून या सगळ्या गोष्ठी फार मनाला लावून घ्यायच्या नाहीत.
वेळ फार महत्त्वाचा आहे आणि आयुष्य अमूल्य आहे.म्हणून आपण काम करत राहिले पाहिजे.काम करा नाहीतर ध्यान करा.तुम्ही १००% देऊन काम करा आणि नंतर बसून ध्यान करा. कोणाचेही बोलणे मनावर घेऊन नका, माझे सोडून. ज्ञान नात खोलवर जाऊ दे, पण लोकांची टीका टिप्पणी नाही.




The Art of living
© The Art of Living Foundation